संजय राऊतांनी नाशिकची चक्रं फिरवली, ठाकरे गटात मोठे फेरबदल; सुधाकर बडगुजरांची उपनेतेपदी निवड,
सुधाकर बॅडगुझर आणि डीजी सूर्यवंशी: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. नाशिकमधील (Nashik) ठाकरेंच्या सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ‘डॅमेज कंट्रोल’साठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची उपनेतेपदी बढती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी (D. G. Suryawanshi) यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा फटका बसला. नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यानंतर मागील काही दिवसात शिंदे गटाकडून ठाकरे गटाला पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने धक्के दिले जात होते. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात खासदार संजय राऊत डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकमध्ये दाखल झाले होते. संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या चार दिवसातच ठाकरेंच्या शिवसेनेत फेरबदल करण्यात आले आहेत.
सुधाकर बडगुजरांची बढती
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चेबांधणी सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डी जी सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर हे याआधी नाशिक जिल्हाप्रमुख होते. लोकसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांनी चांगला प्रचार केला होता. ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. सुधाकर बडगुजर यांनी चांगला प्रचार केल्याने पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची बढती केली आहे.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.
अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले. पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला. 2019 साली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा संधी दिली होती. मात्र, यंदा देखील सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला. सुधाकर बडगुजर हे याआधी नाशिक जिल्हाप्रमुख होते. आता त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
https://www.youtube.com/watch?v=ryu9bcsn5hq
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.