हाफिज सईदला समन्स बजावण्यात येणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी अनुपस्थितीत अभियोग चालणार, केंद्र सरकारची सज्जता
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर आणि धर्मांध दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्करे तोयबा या इस्लामी दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिझ सईद याच्या विरोधात त्याच्या अनुपस्थितीत अभियोग चालविण्यासाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. हाफिझ सईद याला या अभियोगाचे समन्स देण्यात येणार असून ते पाकिस्तानातील भारतीय युच्चायोगाकडून दिले जाईल. हा अभियोग राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाकडून (एनआयए) चालविण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. हा हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तथापि, पाकिस्तानातील सूत्रधारांविरोधात त्यांच्या अनुपस्थित अभियोग चालणार आहे.
हाफिझ सईद याला या अभियोगाचे समन्स पाकिस्तानातील भारतीय उच्चायोग कार्यालयाच्या माध्यमातून लागू केले जाणार आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या वतीने ते लागू करण्यात येईल. हा अभियोग विशेष एनआयए न्यायालयात चालणार असून या न्यायालयाने यापूर्वीच आरोपींच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट लागू केले आहे. ही माहिती उच्च सरकारी अधिकाऱ्याने दिली.
अंतिम संधी देणार
हाफिझ सईद याला न्यायालयासमोर उपस्थित होण्याची अंतिम संधी देण्यासाठी हे समन्स लागू करण्यात येईल. अनुपस्थितीत अभियोग चालविण्यासाठी अशी अंतिम संधी देणे कायद्यातील नियमानुसार आवश्यक असते. अभियोग कायदेशीरदृष्ट्या अभेद्य असावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तो न्यायालयासमोर उपस्थित झाला नाही, तर अभियोग अनुपस्थितीत चालवला जाईल.
पुरवणी आरोपपत्र
या प्रकरणात एनआयएने जुलै 2026 मध्ये पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. या पुरवणी आरोपपत्रात हाफिझ सईद याचे नाव प्रमुख आरोपी आणि कटाचा सूत्रधार म्हणून नोंद करण्यात आले आहे. त्याचे नाव व्यक्तीश: आणि लष्करे तोयबाचा आणि दी रेजिस्टन्स फ्रंट नामक संघटनेचे प्रमुख या नात्यानेही नोंद केले गेले आहे. पहलगाम हल्ला कटाचे सूत्रसंचालन करणे, भारताविरोधात युद्ध पुकारणे, निरपराध लोकांचे हत्याकांड घडविणे, असे अनेक आरोप त्याच्याविरोधात आहेत.
सीमापार समन्स कशासाठी…
सईद भारताच्या न्यायालयासमोर उपस्थित राहण्याची कोणतीही शक्यता नाही. तरीही त्याला सीमापार समन्स देण्यात येणार आहे. कारण, भारताच्या न्यायालयाने सईद याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली होती, हे जगाला समजणे आवश्यक आहे. भारताच्या नव्या गुन्हेगारी कायद्यात सीमापार गुन्हेगारांवरही अभियोग चालविण्याची सुविधा आहे. जेव्हा आरोपी भारताबाहेर वास्तव्यास असतो आणि त्याचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता नसते, तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.
पाकिस्तानवर दबाव
सईदला भारताच्या आधीन करावे, असा आंतरराष्ट्रीय दबाव पाकिस्तानवर आणण्याचा भारताने प्रयत्न केला आहे. दहशतवादाला दिल्या जाणाऱ्या अर्थसाहाय्याच्या विरोधात कार्य करणाऱ्या एफएटीएफ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून पाकिस्तावर सईदचा ताबा देण्यासाठी दबाव आणला जता आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला
जम्मू-काश्मीर येथील एक पर्यटनस्थळ पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 या दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निर्घृण दहशतवादी हल्ला केला होता. त्यात 26 निरपराध नागरीकांचा मृत्यू झाला होता. या नागरीकांना त्यांचा धर्म विचारुन निवडक पद्धतीने मारण्यात आले. भारताने ‘सिंदूर अभियाना’च्या माध्यमातून या हल्ल्याचा सूड घेतला होता, हे अभियान अद्यापही बंद करण्यात आलेले नाही.
Comments are closed.