हाताच्या बोटाला जखम कशी झाली, सुनील तटकरेंनी ठणकावून सांगितलं, ‘माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा ना

अशोक खरात यांच्यावर सुनील तटकरे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या खरातचे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याशी असलेले कथित आध्यात्मिक संबंध समोर आल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या हातावरील जखमा आणि त्यावर मलमपट्टी केलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. हे फोटो काही ‘अघोरी पूजा’ किंवा अंधश्रद्धेशी संबंधित असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या बोटाला नेमकी जखम कशी झाली? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, मी पुन्हा, पुन्हा खुलासा करणार नाही. मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. 2019 साली मी महाविकास आघाडीमध्ये निवडून आलो. 2024 ला महायुतीकडून निवडून आलो. माझी विश्वासार्हता आहे. लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताच्या दोन दिवस आधी अलिबागला ॲड प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. त्यांना भेटून मी निघालो असताना त्यांनी दरवाजा लावला, त्यावेळी माझ्या बोटाला जखम झाली होती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, असे देखील ते म्हणाले.

Sunil Tatkare: 6 एप्रिलला सुनेत्रा वहिनी अर्ज भरणार

बारामती पोटनिवडणुकीबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, बातमतीची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. 6 एप्रिलला सुनेत्रा वहिनी अर्ज भरणार आहेत.  सुप्रिया ताईंचे आभार. कारण त्यांनी घोषणा केली की, त्यांचा उमेदवार नसेल. काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली की आम्ही निवडणूक लढवू. आवश्यकता असेल तर काँग्रेसच्या श्रेष्ठींना आम्ही दिल्लीत भेटू. अजितदादांच्या निधनानंतर बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.  उद्धव ठाकरे यांना देखील मी आणि प्रफुल्ल पटेल भेटू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Rupali Chakankar: रूपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

दरम्यान, गाडीचा दरवाजा बंद करताना बोट अडकून जखम झाल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी केला असून, यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तंत्र-मंत्र आणि पूजाविधी दरम्यान अनामिका कापल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांना चाकणकर यांनी चार दिवसांनी उत्तर दिले. याच वेळी सुनील तटकरे यांनाही गाडीच्या दरवाज्यात बोट अडकून दुखापत झाल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले होते. दोघांनीही बोटाच्या दुखापतीबाबत समान प्रकारचे स्पष्टीकरण दिल्याने या मुद्द्यावरून नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat : तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा

आणखी वाचा

Comments are closed.