ममता बॅनर्जींना 'सर्वोच्च' झटका

तृणमूलची 4 बँक खाती गोठविलेलीच राहणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस गटाला मोठा झटका दिला. पक्षाने स्वत:च्या 4 गोठविलेल्या बँक खात्यांना संचालित करण्याची अनुमती मागणारी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह गोठविले आहे आणि बँक खात्यांमध्ये असलेल्या निधीचा खरा अधिकार कोणाकडे हा प्रश्न अद्याप न्यायालयासमोर विचाराधीन असल्याने आम्ही या प्रकरणी खोलात शिरणार नसल्याचे न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि पी. बी. वराले यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

सुनावणीला वेग द्या

आम्ही या प्रकरणाच्या गुण-दोषात जाऊ इच्छित नाही आणि अनुच्छेद 136 अंतर्गत स्वत:च्या शक्तींचा वापर करण्याच्या बाजूने नाही. आम्ही कलकत्ता उच्च न्यायालयाला याप्रकरणाच्या सुनावणीला वेग देण्याची विनंती करत आहोत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण?

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल पोलिसांकडून गोठविण्यात आलेल्या बँक खात्यांच्या संचालनाची अनुमती देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. या बँक खात्यांना गोठविण्याशी निगडित एफआयआरमध्ये प्रक्रियात्मक त्रुटी होत्या असा दावा ममता बॅनर्जी गटाने केला होता. तर कलकत्ता उच्च न्यायालयाने 27 ऑगस्ट रोजी स्वत:च्या आदेशात या 4 बँक खात्यांना संचालित करण्याची अनुमती देण्यास नकार दिला होता. अशाप्रकारचा दिलासा दिल्यास मागील आदेश कमकुवत होईल असे न्यायालयाचे मानणे होते. तर या 4 बँक खात्यांमध्ये सुमारे 804 कोटी रुपये जमा आहेत.

ईडीची कारवाई

दुसरीकडे ईडी याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगची चौकशी करत आहे. कोलकात्यातील ‘केयरवेल एव्हिएशन’द्वारे 160 कोटी रुपयांच्या पक्षनिधीत फेरफार करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. याच्याच चौकशीच्या अंतर्गत इंडीने एचडीएफसी बँकेत तृणमूलच्या तीन खात्यांमधील 440 कोटी रुपयांची रक्कम गोठविली आहे.

Comments are closed.