कर्करोगावरील औषधांवर 10 पट अधिक फरकाने सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कॅन्सरच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवर तब्बल 10 पट मार्जिन आकारले जात असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. औषधांच्या किमती आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या रकमेत मोठी तफावत असल्यास सर्वसामान्य रुग्णांवर त्याचा गंभीर आर्थिक परिणाम होतो असे न्यायालयाने निरीक्षण नोंदविले.
कॅन्सरचे औषध वितरकांना केवळ 2700 रुपयांमध्ये मिळते, परंतु त्याचे कमाल मूल्य 27,000 रुपये ठेवले जाते आणि या 10 पट अंतरातून मिळणारा पैशांचा लाभ कुणाला प्राप्त होतोय? हा सामान्य रुग्ण आणि करदात्यांवरील मोठा भार असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने सर्व औषधांवर समान रुपात 16 टक्के मार्जिन निश्चित करण्याच्या शक्यतेवर विचार करण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे. कॉर्पोरेट रुग्णालयांमध्sय रुग्णाला केवळ स्वत:चाच केमिस्ट किंवा एखाद्या खास फार्मसीमधून औषधे खरेदी करण्यासाठी भाग पाडले जाण्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना मोठा खर्च करावा लागतो. त्यात औषधांच्या किमतीत मोठे मार्जिन ठेवले जात असल्यास उपचार घेणे आणखी कठीण हेते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
‘हे हत्यासत्र आहे’ अशा कठोर शब्दांत न्यायालयाने औषधांच्या किमतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी आवश्यक औषधे रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले.
Comments are closed.