एलपीयू प्रकरणाची चौकशी केली जाईल.

पंजाब पोलिसांकडून विशेष तपास दलाची स्थापना

वृत्तसंस्था/ चंदीगढ

पंजाबमधील ‘लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’ (एलपीयु) मध्ये उठविण्यात आलेल्या बलात्काराच्या अफवेनंतर उसळलेल्या दंगलीसंबंधात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष तपास दलाची (एसआयटी) स्थापना केली आहे. हे विद्यापीठ फगवाडा येथे आहे. या प्रकरणात महत्वाच्या ठरलेल्या सीसीटीव्ही फूटेजची लक्षपूर्वक तपासणी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन पंजाब पोलिसांनी केले आहे. अफवा पसरल्यानंतर झालेला हिंसाचार, जाळपोळ, पोलिसांवरील हल्ले आदींचीही चौकशी केली जाणार आहे.

पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात जाऊन स्वत: पाहणी केली होती. ज्यांचा हिंसाचारात सहभाग आहे, अशा प्रत्येकाच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. त्यानुसार मंगळवारी विशेष तपास दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला.

प्रकरण काय आहे…

या विद्यापीठात राहून शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर एका बाहेरच्या व्यक्तीने परिसरात घुसून बलात्कार केला अशी अफवा रविवारी उठविण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये हे वृत्त झपाट्याने पसरल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी हिंसाचार केला. विद्यापीठाच्या काही भागाला आग लावण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरही वाहतूक रोखली होती. पोलिसांनी लाठीमार करुन स्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले होते. बलात्काराचे प्रकरण ही अफवाच आहे, हे आतापर्यंतच्या चौकशीतून स्पष्ट झाले असून हे हिंसाचार माजविण्याचे कारस्थान होते, हे देखील स्पष्ट झाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राजकीय वळण

पंजाबमध्ये येत्या पाच महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लावण्यात आले आहे. हे विद्यापीठ पूर्वाश्रमीच्या आम आदमी पक्षाच्या आणि सध्या भारतीय जनता पक्षात असणाऱ्या राज्यसभा खासदाराचे आहे. त्यामुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज्यात मुख्य चुरस सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आहे. मात्र, राज्यात बराच काळ सत्तेवर राहिलेल्या अकाली दलानेही या संदर्भात दंड थोपटले आहेत.

बाहेरच्या लोकांकडून दंगल ?

बलात्काराची अफवा उठल्यानंतर प्रारंभी विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील सुरक्षेसंदर्भात आणि सोयींच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. ते शांततापूर्ण होते. तथापि, या आंदोलनात बाहेरचे लोक घुसल्याचा आणि त्यांनी दंगल घडविल्याचा संशय आहे. पोलिसांनी या दंगलींचे सर्व सीसीटीव्ही फूटेज संकलित केले असून या फूटेजच्या आधारावर दंगलखोरांचा मागोवा घेतला जात आहे. पोलिसांनी अज्ञात दंगलखोरांच्या विरोधात एफआयआर सादर केला असून दंगलखोरांना पकडण्यासाठी पथके निर्माण करण्यात आली आहेत. काही विद्यार्थ्यांचीही चौकशी आता केली जात आहे.

संयमाने हाताळली स्थिती

पोलिसांनी दंगलकाळात अत्यंत संयमाने स्थिती हाताळली आहे. त्यांनी वाद मिटविण्यासाठी विद्यापीठाचे व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याचा अनेकदा प्रयत्न गेल्या दोन दिवसांमध्ये केला. विद्यार्थ्यांची सुरक्षा हा आमचा प्राधान्यक्रम असून त्यांना त्रास होऊ नये म्हणून शक्य तितकी सर्व दक्षता पोलिसांनी घेतली आहे. या सर्व प्रकरणातून दंगल कशी उद्भवली आणि ती इतक्या वेगाने कशी पसरली, याची चौकशी केली जात असून या दंगलींचे कारस्थान कोणी घडविले, याचाही शोध घेतला जाणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांची पाच सदस्यीय समिती स्थापन केली असून ती सहकार्य करीत आहे.

विद्यार्थ्यांच्या समितीचीही स्थापना

ड पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समितीची स्थापना

ड बाहेरच्या लोकांनी विद्यार्थ्यांमधे घुसून दंगल घडविल्याचा पोलिसांना संशय

ड दंगलीच्या कारस्थानाचा शोध घेतला जाणार, कठोरतम कारवाईचा निर्धार

ड प्रकरणाला राजकीय वळण, राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

Comments are closed.