विधीवत दीप प्रज्वलित करण्याचे 'सर्वोच्च' निर्देश
दीपथून’ प्रकरणी न्यायालयाची कठोर भूमिका : मंदिराचे विश्वस्त मंडळ निलंबित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूतील मदुराई नजीकच्या सुब्रम्हणयिन स्वामी मंदिरातील दीपप्रज्वलन प्रकरणी तामिळनाडू सरकारवर कठोर कार्यवाही करण्याची वेळ आली आहे, असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या मंदिराच्या ‘दीपथून’ नामक दीपस्तंभावर हे दीपप्रज्वलन प्रत्येक कार्तिकी पौर्णिमेला केले जाते. अनेक शतकांची तशी परंपरा आहे. मात्र, सध्या ही परंपरा न्यायप्रविष्ट आहे. एक वेळची अनुमती म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हे दीपप्रज्वलन ‘दीपथून’वरच व्हावे, असा आदेश दिला. मात्र, तामिळनाडूतील टीव्हीके पक्षाच्या सरकारने या आदेशाचे तंतोतंत पालन केले नाही. दीपप्रज्वलन करण्यात आले. तथापि ते परंपरेप्रमाणे दीपस्तंभावर करण्यात आले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला हा इशारा दिला.
दीपप्रज्वलन परंपरेनुसार करण्यात आले नाही, म्हणून तामिळनाडू सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाची अवमानना केल्याची याचिका काही संघटनांनी सादर केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. न्या. अरविंद कुमार आणि न्या. विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होणे ही अत्यंत वेदनादायक आणि क्लेषकारक बाब आहे. जे लोक अशा प्रकारे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करत आहेत, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी लागणार आहे. त्यांना सोडले जाणार नाही. या परिस्थितीवर कठोर विचार करण्याची वेळ आता आली आहे याची संबंधितांनी जाणीव ठेवावी, असा इशारा खंडपीठाने राज्य सरकारला दिला.
मंदिर व्यवस्थापन बरखास्त
केवळ इशारा देऊन न्यायालय थांबलेले नाही. तर सुब्रम्हणयिन स्वामी मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त करण्यात आले असून त्याला निलंबित अवस्थेत ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्या स्थानी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. वैद्यनाथन आणि न्या. व्ही. पार्थिपन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता हे दोन माजी न्यायाधीश मंदिराचे व्यवस्थापन पुढील आदेशापर्यंत सांभाळणार आहेत. त्यामुळे तामिळनाडू सरकारला जबर धक्का बसला आहे.
‘दीपथून’वर आज पुन्हा दीपप्रज्वलन होणार
परंपरेनुसार मंदिरानजीकच्या ‘दीपथून’वर शनिवारी पुन्हा दीपप्रज्वलन केले जावे, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाचे पालन करण्याचे उत्तरदायित्व आता मंदिराच्या नव्या विश्वस्तांवर असेल. हे विश्वस्त सर्वोच्च न्यायालयानेच नियुक्त केलेले असल्याने शनिवारी परंपरेनुसार दीपप्रज्वलन केले जाईल, हे निश्चित मानण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांच्या भावनांचा आदर होईल, अशी समाधानयुक्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रकरण नेमके काय…
तामिळनाडूतील मदुराई नगरानजीक टेकडीवर सुब्रम्हणियन स्वामी मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात एक उंच ‘दीपथून’ किंवा दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभावर प्रत्येक कार्तिकी पौर्णिमेला दीपप्रज्वनल केले जाते. तसेच या दिवशी येथे हिंदू भाविकांची यात्राही असते. ही परंपरा अनेक शतकांपासून आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी तामिळनाडू सरकारने या दीपप्रज्वलनाला विरोध केला. या मंदिरापासून काही अंतरावर मुस्लीमांचा दर्गा आहे. यात्रेमुळे आणि दीपप्रज्वलनामुळे दर्ग्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होतो, या कारणासाठी हिंदूंचे दीपप्रज्वलन टाळले गेले. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहचले. 2026 मध्ये राज्यात आलेल्या टीव्हीके सरकारनेही दीपप्रज्वलनाला विरोधच केला. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून तेथे अंतिम सुनावणी होईल. तोपर्यंत एक वेळची अनुमती म्हणून दीपप्रज्वलन परंपरेनुसार करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
मंदिरांचे विश्वस्त निलंबित
ड मंदिराचे विश्वस्त निलंबित, माजी उच्च न्यायालय न्यायाधीशांची नियुक्ती
ड शनिवारी पुन्हा परंपरेनुसार दीपथूनवरुनच दीपप्रज्वलन केले जाण्याचा आदेश
ड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होणे यातनादायी आणि क्लेषकारक
Comments are closed.