प्रतिभा पवार- सोनिया गांधी यांची भेट, सुप्रिया सुळे यांच्याकडून फोटो शेअर

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो प्रतिभा पवार आणि सोनिया गांधी यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो स्वत: क्लिक केल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती.

प्रतिभा पवार-सोनिया गांधी यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियातून माहिती दिली आहे.  सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दोन उल्लेखनीय महिला – कणखर, दयाळू आणि खऱ्या अर्थाने सन्माननीय. त्यांची सहनशीलता, शहाणपण आणि अढळ जिद्द त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला आजही प्रेरणा देत आहेत. सुप्रिया सुळे यांनीच हा फोटो शेअर  केला असून त्या पोस्टमध्ये  हा फोटो त्यांनीच क्लिक केल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यानिमित्तानं शरद पवार नवी दिल्लीत पोहोचले आहेत. काल शरद पवार यांनी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु असलेल्या जंतर मंतरवर अभिजीत दिपके यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी विद्यार्थ्यांचं नीट परीक्षेतील त्रुटींबाबत सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती घेतली. यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

शरद पवार यांनी या भेटीसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. ते म्हणाले की   नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी आज देशाचे माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

बैठकीदरम्यान मी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पेपरफुटीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याबाबत माझी सविस्तर भूमिका मांडली. यासोबतच शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी व्यवस्थापन तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर माननीय पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन माननीय पंतप्रधानांनी दिले. या प्रसंगी माननीय खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.

हेदेखील वाचा

Comments are closed.