विकास लवांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कुणाचा वरदहस्त हे उघड; सुप्रिया सुळे यांचा संताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी येथे शाईफेक करण्यात आली. यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून शाईफेक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत या घटनेचा निषेध केला. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे.

भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर स्वतःला वारकरी म्हणवणाऱ्या संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकारी गुंडांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्की, शिवीगाळ व शाईफेक या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीमध्ये मतभेदांना हिंसा, धमकी आणि दादागिरीने उत्तर देणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. अशा प्रवृत्ती समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वारकरी संप्रदाय शांतता, संयम आणि विचारांचे प्रतीक आहेत; त्यांच्या नावाचा वापर करून गुंडगिरी करणाऱ्यांना समाज कधीही माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

Comments are closed.