तो जेव्हा संघाबाहेर होता, तेव्हा…; सूर्यकुमार यादवने सांगितली संजू सॅमसनची पडद्यामागील स्टोरी

सूर्यकुमार यादव संजू सॅमसन IND vs WI T20 विश्वचषक 2026 : संजू सॅमसनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सनी पराभव करत स्पर्धेच्या टॉप-4 मध्ये स्थान निश्चित केले. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर विंडीजने प्रथम फलंदाजी करत 195 धावांचा डोंगर उभा केला होता. या मैदानावर यापूर्वी भारताने 180 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग कधीच यशस्वी केला नव्हता. त्यामुळे 196 धावांचे आव्हान मोठे आणि आव्हानात्मक मानले जात होते. मात्र संजू सॅमसनच्या धडाकेबाज आणि संयमी खेळीमुळे भारताने हा इतिहास बदलला आणि टी-20 विश्वचषकात सर्वात मोठा यशस्वी रनचेस नोंदवला. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “नक्कीच ही खूप आनंदाची भावना आहे. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, ते खूप समाधान देणारं आहे. सगळ्यांनी म्हटलं होतं की हा सामना ‘करो या मरो’ असा, जणू उपांत्यपूर्व फेरीसारखा आहे. अशा वेळी पोरांनी ज्या पद्धतीने धैर्य आणि जिद्द दाखवली, ती खरोखर कौतुकास्पद आहे.

संजू सॅमसनबद्दल काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

संजू सॅमसनबद्दल सूर्या म्हणाला की, मी नेहमी एक गोष्ट सांगतो, चांगल्या गोष्टी त्या लोकांनाच मिळतात जे संयम बाळगतात आणि योग्य वेळेची वाट पाहतात. त्यालाही आत्ताच तेच सांगितलं. तो जेव्हा संघाबाहेर होता, तेव्हा पडद्यामागे त्याने खूप मेहनत घेतली. त्याच मेहनतीचं फळ त्याला अगदी योग्य क्षणी मिळालं. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत नेलं, ते अप्रतिम होतं.

गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल काय म्हणाला सूर्या?

टीम इंडियाच्या गोलंदाजांबद्दल सूर्या म्हणाला की, मला वाटतं प्रत्येकाने ठरलेल्या योजनेनुसार गोलंदाजी केली. इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर दवाचा परिणाम होतो, दुसऱ्या डावात चेंडू चांगला बॅटवर येतो, त्यामुळे 200 धावांचं लक्ष्य गाठता येण्यासारखं असतं, हे आम्हाला ठाऊक होतं. त्यानंतर फलंदाजांनी छोट्या-छोट्या भागीदाऱ्या करत डाव खोलवर नेला, हेच विजयाचं मुख्य कारण ठरलं.

मुंबईला पोहोचल्यानंतर उपांत्य फेरीचा विचार करू….

उपांत्य फेरीबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, त्या टप्प्यावर पोहोचल्याचा खूप आनंद आहे. पहिल्या सामन्यापासून आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्यावरून आम्ही उपांत्य फेरीस पात्र होतो, असं मला वाटतं. सामना मुंबईत आहे, ही आणखी खास बाब आहे. पण सध्या त्याचा विचार करणार नाही. उद्या विश्रांती घेऊ, मुंबईला पोहोचल्यानंतर त्याबद्दल विचार सुरू करू.

अब्जावधी लोकांच्या अपेक्षांबद्दल कर्णधार सूर्या शेवटी म्हणाला, अपेक्षा नेहमीच असतात. पण मैदानावर संघ म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे स्पष्ट असणं महत्त्वाचं आहे. पोरांनाही तेच सांगितलं, हो, दबाव असेल, प्रेक्षक असतील, अपेक्षा असतील. पण अशा सामन्यांत अधिक धैर्य दाखवावं लागतं. स्वतःचा सर्वोत्तम खेळ करावा लागतो, सकारात्मक राहावं लागतं आणि दबावाखालीही योग्य निर्णय घ्यावे लागतात. यात आम्ही चांगलं काम केलं.

हे ही वाचा –

Sanju Samson IND vs WI T20 World Cup : सामना जिंकवताच झटपट गेला, गुडघ्यावर बसला; ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय केलं?, डोळे पाणावणारा VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.