सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार.

पक्ष निरीक्षक अमित शाह यांच्याकडून घोषणा : भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड

घडामोडी…

  • आज सकाळी 11 वाजता भव्य-दिव्य शपथविधी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांची उपस्थिती
  • रुपा गांगुली यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री होणार

वृत्तसंस्था/कोलकाता

सुवेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री करण्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. कोलकाता येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या भाजप विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड झाली. बैठकीनंतर अमित शाह यांनी त्यांच्या नावाची घोषणा करत त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. आता शनिवारी सकाळी 11 वाजता कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर नवे मुख्यमंत्री शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, शाह आणि एनडीएचे इतर अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालचा नव्या मुख्यमंत्री ठरविण्यासाठी शुक्रवारी दुपारी कोलकाता येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षनिरीक्षक म्हणून बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी प्रस्तावक या नात्याने सुवेंदू अधिकारी यांचे नाव पुढे केले. त्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व भाजप आमदारांनी मंजुरी दिल्याने अमित शाह यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. सुवेंदू हे मुख्यमंत्री म्हणून  राज्याचे नेतृत्त्व करत असताना राज्याला दोन उपमुख्यमंत्रीही मिळतील. रुपा गांगुली यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती निश्चित झाली आहे. दुसरे उपमुख्यमंत्री उत्तर बंगालमधील पुरुष आमदार असतील, असे सांगण्यात आले. तूर्तास नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. सुवेंदू यांच्याकडे गृह विभागाचा कार्यभारही असेल.

कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर होणाऱ्या नवीन भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या कार्यक्रमासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पाऊस असूनही, सर्व व्यवस्था चोख करण्यात आली आहे. देशभरातील रालोआशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि खासदार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कोलकाता येथे दाखल होऊ लागले आहेत. तत्पूर्वी, शुक्रवारी सायंकाळी सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला.

विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने 207 जागा जिंकल्या. सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. तसेच त्यांनी नंदीग्राममधूनही सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. तिथे त्यांनी 2021 मध्ये ममता यांचा पराभव केला होता. 4 मे रोजी जाहीर झालेल्या निकालानंतरच सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर राहिले होते. निवडणुकीच्या निकालांमध्ये 293 पैकी 200 हून अधिक जागा जिंकून भाजपने राज्याच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडवले आहे. तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाबाबत जोरदार चर्चा सुरू होती. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी हे सर्वात प्रबळ दावेदारांपैकी एक मानले जात होते. संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे.

प. बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी 7 मे रोजी राज्य विधानसभा विसर्जित केली. कोलकाता गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेचा हवाला देत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड विजयानंतर विधानसभेचे हे विसर्जन करण्यात आले आहे.

सुवेंदू अधिकारी यांची कारकीर्द

सुवेंदू अधिकारी यांचा जन्म 15 डिसेंबर 1970 रोजी पूर्व मेदिनीपूरमधील एका राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे स्वत: बंगालच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. अधिकारी घराण्याचे संपूर्ण जिह्यावर अनेक दशकांपासून वर्चस्व आहे. सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले आणि 1989 मध्ये काँग्रेस स्टुडंट कौन्सिलमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1995 मध्ये त्यांनी कांथी नगरपालिकेतून नगरसेवकपदाची निवडणूक लढवून आपल्या निवडणूक प्रवासाला औपचारिकपणे सुरुवात केली. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत टीएमसीची स्थापना केली होती. तथापि, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी ते टीएमसीमधून बाहेर पडून भाजपमध्ये सामील झाले. सुवेंदू यांनी सलग दोन निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचा सामना केला. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राममधून त्यांचा पराभव केला. आता 2026 च्या निवडणुकीत त्यांनी भवानीपूरमधून निवडणूक लढवत त्यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचा पराभव केला.

Comments are closed.