घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव प्रताप सरनाईकांवर संतापले


स्वामी समर्थ मठ घोडबंदर रोड ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील घोडबंदर रोडवरील आनंद नगर याठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मठाच्याविरोधात (Swami Samarth Math) पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. या मठावर करवाई करू नये, अशी मागणी करत स्वामीभक्तांनी सोमवारी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्वामी भक्तांनी ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Mahanagarpalika) आवारातच ठिय्या मांडत आरती सुरु केली. हे सर्व भक्त जमिनीवर बसकण मारुन बसले होते. यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) हेदेखील त्यांच्यासोबत आंदोलनात सामील झाले होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची मतदार संघाच्या विकास कामासंदर्भात पालिका आयुक्तांसोबत बैठक सुरु असताना हा प्रकार घडला.

घोडबंदर रोडवरील हा मठ आम्ही कोणत्याही परिस्थितीत हटवून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा यावेळी अविनाश जाधव यांनी घेतला. हा मठ तब्बल 22 ते 25 वर्षे जुना आहे. मठाची जागा ही म्हाडाची आहे. मात्र, या जागेच्या बाजूला एका स्थानिक आमदाराकडून लग्नाचा हॉल आणि जीम उभारण्याचे काम सुरु आहे. या आमदाराला आता मठाच्या जागेवर गार्डन बनवायचे आहे. त्या गार्डनमध्ये जितकी माणसं येणार नाहीत, तितके लोक याठिकाणी स्वामींवरील श्रद्धेपोटी येतात. प्रत्येक गुरुवारी याठिकाणी जत्रेसारखी गर्दी असते. ही जागा गार्डन बनवून अश्लील चाळे करण्यासाठी आहे की श्रद्धेने येऊन शांत बसण्यासाठी आहे, असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारला.

स्थानिक आमदार या परिसरात सरकारी पैशांनी हॉल उभारतात आणि त्याला आपल्या आई-वडिलांचे नाव देतात. या हॉलची चावी स्वत:च्या कार्यकर्त्यांकडे दिली जाते आणि त्या जागेवर कब्जा ठेवला जातो. स्थानिक आमदारांकडून हे हॉल त्यांच्या मालकीचे असल्यासारखे वापरले जातात. या आमदाराने आयुष्यभर लग्नाचे हॉल बनवण्याच्या नादात आदिवासी, बिल्डर्स आणि गरिबांच्या जागा लाटल्या. सरकार स्वामी समर्थांच्या मठासाठी असणारी पाच गुंठे जमीन देणार नसेल तर स्वामी माफ करणार नाहीत. कृपा करून स्वामींच्या नादाला लागू नका, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. स्वामीभक्तांनी मठाच्या जागेसाठी पैसे भरण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता ठाणे महानगरपालिका याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी सांगणार, ‘योग्य संगतीचा परिणाम’; घडणार अद्भूत चमत्कार!

आणखी वाचा

Comments are closed.