स्वतंत्र भारद्वाज यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्यावेळी एका आंदोलकाच्या पित्याला मारहाण करण्याचा आरोप असलेला इन्फ्लि्यूएन्सर स्वतंत्र  भारद्वाज याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात भारद्वाज याला अॅट्रॉसिटी कायद्यानुसार अटक करण्यात आली होती.

मी एका आंदोलकाच्या वडिलांना मारहाण केली होती. तरीही मला अटक झालेली नाही, अशी बढाई भारद्वाज याने काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्ट कार्यक्रमात मारली होती. त्यामुळे त्याला त्वरित अटक करावी आणि त्याच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा सादर करावा, अशी मागणी कॉक्रोच जनता पक्षाने केली होती. त्यासाठी या संघटनेने दिल्लीच्या पोलीस स्थानकावर मोर्चा नेला होता आणि धरणेही दिले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी भारद्वाज याला अटक केली आणि त्याच्यावर अॅट्रोसिटी कायदा लागू केला. त्याला प्रथम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्या कोठडीचा कालावधी सोमवारी संपल्यानंतर पुन्हा त्याला न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ प्रताप सिंग यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत पाठवणी केली.

भारद्वाजच्या अडचणीत वाढ

आपले कपिल शर्मा आणि चिराग पास्वान या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांशीही संबंध आहेत, असे प्रतिपादन भारद्वाज याने या पॉडकास्टमध्ये केले होते. चिराग पास्वान यांनी त्याचे प्रतिपादन स्पष्टपणे नाकारले होते. तसेच आपल्या नावाचा दुरुपयोग केल्यासंबंधात त्याला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

Comments are closed.