आयपीएलला टी-20 मुंबई लीगचा होणार दमदार फायदा, मराठा रॉयल्स संघाचे लायजनिंग मॅनेजर सुनील रामचंद्रन यांचे मत
टी-20 मुंबई लीगचा ज्वर आता टिपेला पोहोचला आहे. गतविजेता मराठा रॉयल्सचा संघ सलग दुसऱयांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. ‘मुंबईच्या या लीगचा स्तर हा आयपीएलला साजेसा असाच आहे आणि त्यामुळेच आयपीएलला मुंबईच्या लीगमुळे दमदार फायदा होईल. कारण मुंबईच्या युवा खेळाडूंना आता आयपीएलचे व्यासपीठ खुणावत आहे,’ असे मराठा रॉयल्स संघाचे लायजनिंग मॅनेजर सुनील रामचंद्रन यांनी फायनलआधी सांगितले.
सिद्धेश लाडचे सरस नेतृत्व
मराठा रॉयल्सचा कर्णधार सिद्धेश लाड हा दमदार नेतृत्व करतो. सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन चालणारा तो कर्णधार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युवा खेळाडूंना संधी देतो. सिद्धेश कर्णधार म्हणून सर्वाचे ऐकून घेतो आणि अचूक निर्णय घेतो, त्यामुळेच सलग दुसऱयांदा आम्ही फायनलला पोहोचलो आहोत, असे रामचंद्रन म्हणाले.
एमसीएने अप्रतिम काम केलं…
मुंबई क्रिकेट संघटनेने या लीगचे आयोजन एवढय़ा अप्रतिमपणे केले आहे की, स्पर्धेला आयपीएलचा दर्जा प्राप्त झाला असल्याचे वाटते. युवा खेळाडूंनी ही लीग चांगली संधी देते, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि लीगचे गव्हर्नर राजदीप गुप्ता यांनी अप्रतिम काम केले, असेही रामचंद्रन यांनी सांगितले.
तुषारच्या अनुभवाचा फायदा
तुषार देशपांडेसारखा अनुभवी खेळाडू आमच्या संघात आहे आणि त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. मुख्य प्रशिक्षक अमित दाणी व सहाय्यक प्रशिक्षक जुड सिंग, भावेश पटेल, अंकित चव्हाण आणि ओमकार खानविलकर यांचेही चांगले मार्गदर्शन मिळत असल्याचे रामचंद्रन म्हणाले.
Comments are closed.