आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?

नवी दिल्ली : बांगलादेश क्रिकेट बोर्डानं शनिवारी आयसीसीकडे मोठी मागणी केली आहे. बांगलादेशनं पहिल्यांदा त्यांचे टी 20 वर्ल्ड कपमधील सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता बांगलादेशनं दुसरी मागणी केली आहे. आयसीसीला पत्र लिहून आमचा ग्रुप बदला असं बांगलादेशला म्हटलं आहे. आम्हाला आयरलँडच्या जागी ब गटात ठेवा,असं बांगलादेशनं म्हटलं आहे. सध्या बांगलादेश क गटात असून वेस्ट इंडिज, इटली, इंग्लंड आणि नेपाळचा समावेश आहे.  बांगलादेशचे सामने  कोलकाता आणि मुंबईत होणार आहेत. ब गटात आयरलँडसोबत श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि झिम्बॉब्वे यांचा  समावेश आहे. आयरलँडचे सामने कोलंबो आणि पल्लेकेले येथे आहेत.

आयसीसीची दोन सदस्यांची टीम भारतातील सुरक्षा व्यवस्थेबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आश्वस्त करण्यासाठी ढाकामध्ये गेली होती. इवेंट आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे महाप्रबंधक गौरव सक्सेना आणि इंटिग्रिटीचे महाप्रबंधक एंड्रयू एफग्रेव यांचा समावेश आहे.बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आयसीसीच्या प्रतिनिधींसोबत भेटल्यानंतर एक वक्तव्य जारी केलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कपसाठी आयसीसीच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाल्याचं म्हटलं.

एफग्रेव या बैठकीत उपस्थित होते.तर, सक्सेना बांगलादेशचा व्हिसा न मिळाल्यानं ते ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे पुन्हा त्यांचे सामने श्रीलंकेत खेळवावे असं सांगितलं आहे. बोर्डानं बांगलादेशच्या सरकारचं मत, बांगलादेशची टीम, मीडिया, प्रेक्षकांच्या सुरक्षेसंदर्भातील मत आयसीसीला कळवली.

बीसीबीचे अध्यक्ष मोहम्मद अमीनुल इस्लाम, उपाध्यक्ष मोहम्मद शकावत हुसैन, फारुक अहमद, क्रिकेट संचालन समितीचे संचालक नजमूल अबेदीन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी उपस्थित होते. मात्र, आयसीसी बांगलादेशची मागणी स्वीकारण्याची शक्यता कमी आहे.

बांगलादेशमधील घडामोडींमुळं कोलकाता नाईट रायडर्सच्या मुस्तफिजूर रहमान याला आयपीएलच्या टीममध्ये खेळवू नये अशी मागणी सोशल मीडियावरुन करण्यात आली होती. बीसीसीआयनं त्यानंतर केकेआरला मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं टी 20 वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेत सामने खेळवावेत अशी मागणी केली होती. आयसीसीकडून बांगलादेश क्रिकेट बोर्डाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बीसीबी त्यांच्या मागणीवर ठाम राहिल्यास त्यांना स्पर्धेतून बाहेर जावं लागू शकतं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.