वसईच्या पेटिट रुग्णालयातील लिफ्टमध्ये १२ जण अडकले
वसई-विरार पालिकेच्या डी. एम. पेटिट रुग्णालयातील नव्या इमारतीत सायंकाळी साडेसातच्या सुमारास लिफ्टचा रोप अचानक घसरल्याने केबिन मध्येच अडकली. यावेळी लिफ्टमध्ये तब्बल १२ नागरिक असल्याने एकच घबराट उडाली. केबिनमध्ये अडकलेल्या नागरिकांचा अर्धा तास जीव टांगणीला लागला होता. अखेर सुरक्षारक्षक आणि इलेक्ट्रिशियन यांच्या मदतीने सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.
रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका महिलेची आणि तिच्या बाळाची भेट घेण्यासाठी नातेवाईक आले होते. भेटीची वेळ संपल्याचे कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर हे सर्व नातेवाईक एकाच वेळी लिफ्टमध्ये शिरले. संबंधित लिफ्टची क्षमता सहा ते आठ प्रवासी किंवा सुमारे ५०० किलो वजनाची असताना तब्बल १२ जणांनी प्रवास केल्याने क्षमतेपेक्षा अधिक भार निर्माण झाला. त्यामुळे लिफ्टचा वायर रोप घसरून केबिन अचानक खाली आली आणि मध्येच अडकली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed.