विजेअभावी सहा तालुक्यांतील २५ योजना ठप्प, रायगडमध्ये ‘जलजीवन’चे नळ बनले शोपीस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सरकारकडे निधीच नसल्याने रायगड जिल्ह्यात जलजीवन योजनेचा घसा कोरडा पडला आहे. अनेक ठिकाणी योजनेची कामे करून पाण्याच्या टाक्या तसेच घराघरांत नळदेखील बसवले आहेत. मात्र वीज जोडणीअभावी रोहा, महाड, पोलादपूर, मुरुड, म्हसळा आणि माणगाव या सहा तालुक्यांतील तब्बल २५ पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनअंतर्गत बसविण्यात आलेले नळ केवळ शोपीस बनले असून आधीच टंचाई, त्यात पाणी नसल्याने हजारो गावकऱ्यांची पाण्यासाठी फरफट होत आहे.

रायगड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. अशा परिस्थितीत जलजीवन मिशनमुळे घरापर्यंत पाणी मिळेल, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र योजना पूर्ण होऊनही प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू न झाल्याने या आशेवर पाणी फेरले गेले आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पाच हजार तीन गावे आणि वाड्यांमध्ये एक हजार ५९२ नळपाणी योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र त्यातील २५ योजनांची कामे पूर्ण होऊनही केवळ विद्युत जोडणी नसल्याने त्या बंद अवस्थेत आहेत. पाणी उपसण्यासाठी आवश्यक रोहित्र, विद्युत खांब आणि वीजतारांची जोडणी झालेली नसल्याने पाणी गावांपर्यंत पोहोचू शकलेले नाही.

या तालुक्यात फाटका

– रोहा : ४ योजना
– म्हसळा : ३ योजना
– पोलादपूर : ६ योजना
– महाड : ४ योजना
– माणगाव : ५ योजना
– मुरुड : ३ योजना

तीन कोटींच्या निधीची गरज

२५ योजनांना विद्युत जोडणी देण्यासाठी तब्बल तीन कोटी सात लाख ६३ हजार ७९१ रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप हा निधी उपलब्ध झालेला नाही. परिणामी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या योजना धूळखात पडल्या असून दुसरीकडे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हा नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे निधीची मागणी केली आहे. त्यासाठी वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र अद्याप निधी मिळालेला नाही.

विद्युत जोडणीसाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मोहन सरवदे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

Comments are closed.