महापालिकेच्या जुन्या इमारतींची दुरुस्ती होणार, तब्बल 85 सल्लागारांची नियुक्ती होणार! संरचनात्मक दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि सुरक्षेची जबाबदारी
मुंबई महापालिकेच्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींच्या संरचनात्मक दुरुस्ती तसेच पुनर्बांधणीच्या कामांना गती देण्यासाठी 85 सल्लागार संस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने मागवलेल्या स्वारस्य अभिव्यक्तीला 96 संस्थांनी प्रतिसाद दिला असून, त्यापैकी 85 संस्था पात्र ठरल्या आहेत. या सल्लागारांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
महापालिकेची प्रसूतिगृहे, रुग्णालये, बाजारपेठा, अग्निशमन केंद्रे तसेच कर्मचारी निवासस्थाने अशा अनेक इमारती 30 ते 35 वर्षांपेक्षा जुन्या आहेत. पर्यावरणाचा परिणाम आणि काँक्रीटमधील पोलादाला गंज लागल्यामुळे या इमारतींची झीज होत आहे. नियमित देखभाल करूनही मोठय़ा संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता निर्माण होत असल्याने या कामांसाठी तज्ञ संस्थांची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
सल्लागार संस्थांकडून इमारतींचे स्थळ सर्वेक्षण, संरचनात्मक स्थिरतेची तपासणी, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट (एनडीटी), दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीची पद्धत निश्चित करणे, अंदाजपत्रक आणि निविदा तयार करणे आदी कामे करून घेतली जाणार आहेत.
यापूर्वी महापालिकेच्या तालिकेवर 63 सल्लागार संस्था होत्या. मात्र, त्यांच्या नियुक्तीची मुदत संपल्याने नव्याने प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी 17 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त 96 अर्जांपैकी 85 संस्थांनी किमान 50 टक्के गुण मिळवून पात्रता सिद्ध केली, तर 11 संस्था अपात्र ठरल्या आहेत. पात्र सल्लागारांची ए, बी, सी, डी आणि ई अशा पाच गटांत वर्गवारी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, सल्लागारांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार आणि दुरुस्तीच्या खर्चानुसार शुल्क दिले जाणार आहे. तसेच तालिकेवरील सल्लागारांना समान प्रमाणात कामे देण्याचे प्रस्तावित आहे.
Comments are closed.