टाटा ग्रुपच्या 10 कंपन्यांकडून लाभांश जाहीर, सर्वाधिक लाभांश कोणत्या स्टॉकवर मिळणार?

मुंबई : आर्थिक वर्ष 2024-25 मधील शेवटच्या तिमाहीमधील कामगिरीचे निकाल विविध कंपन्यांकडून जाहीर केले जात आहेत. कंपन्यांकडून आर्थिक कामगिरीच्या आधारावर शेअरधारकांना लाभांश दिला जातो. टाटा समुहाच्या 10 प्रमुख कंपन्यांकडून आर्थिक वर्ष 2024-25  च्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीचे निकाल जाहीर करताना लाभांश देखील जाहीर केला आहे. यामध्ये टिसीएस, बनारस हॉटेल्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टायटन, टाटा इन्वेस्टमेंट, टाटा पॉवर, टाटा एलेक्सी, इंडियन हॉटेल्स, आणि रैलिस इंडिया यांच्याकडून लाभांश जाहीर करण्यात आले आहेत. एका शेअरचा विचार करता या कंपन्यांकडून एकूण 184.60 रुपयांचा लाभाश जाहीर केला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराकडे टाटांच्या या कंपन्यांचा प्रत्येकी 1 शेअर असेल त्याला 184.60 रुपये लाभांश म्हणून मिळतील.

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसनं चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना प्रतिशेअर 30 रपयांचा अंतिम लाभांश शिफारस केला आहे. 1 रुपयांच्या दर्शनी किंमतीवर हा लाभांश दिला जाणार आहे. यासाठी रेकॉर्ड डेट 4 जून 2025 आहे. एजीएमची तारीख 19 जून 2025 तर लाभांश पेमेंट डेट 24 जून 2025 इतका आहे.

टाटा स्टील किती लाभांश देणार?

टाटा स्टीलनं 2024-25 साठी शेअरधारकांना 1 रुपयांच्या दर्शनी किमतीवर 3.60 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीनं 6 जून 2025 रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. म्हणजे या तारखेला ज्यांच्याकडे टाटा स्टीलचा शेअर असेल त्याला लाभांश दिला जाईल. कंपनीची एजीएम 2 जुलै 2025 होणार आहे त्यानंतर लाभांश जाहीर केला जाईल.

टाटा पॉवर

टाटा पॉवरच्या 1 रुपयांच्या दर्शनी किंमतीवर 2.25 रुपयांचा अंतिम लाभांश प्रतिशेअर देण्याची शिफारस आहे. यासाठी रेकॉर्ड डेट 20 जून 2025 निश्चित करण्यात आली आहे. 7 जुलै रोजी शेअर धारकांना लाभांश दिला जाईल. टाटा पॉवरची एजीएम 4 जुलै 2025 ला होणार आहे.

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड

इंडियन हॉटेल्सनं 1 रुपयाच्या दर्शनी किंमतीवर प्रति शेअर 2.25 रुपयांचा लाभांश देण्याची शिफारस केली आहे. या कंपनीच्या एजीएमचं आयोजन जुलै महिन्यात होईल. रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

बनारस हॉटेल्स  :

टाटा ग्रुपच्या बनारस हॉटेल्स या कंपनीनं 25 रुपयांच्या प्रति शेअर लाभांशाची शिफारस केली आहे. हा लाभांश एजीएमच्या मंजुरीच्या अधीन आहे.

टायटन

टायटन कंपनी लिमिटेडनं 1 रुपयांच्या दर्शनी किंमतीवर प्रति शेअर 11 रुपयांच्या लाभांशाची शिफारस केली आहे. रेकॉर्ड डेटची घोषणा करण्यात आलेली नाही. एजीएम संदर्भातील घोषणा करण्यात आलेली नाही.

टाटा इन्वेस्टमेंट किती लाभांश देणार?

टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 10 रुपयांच्या दर्शनी मुल्यावर प्रति शेअर 27 रुपयांच्या लाभांशाची शिफारस केली जात आहे. कंपनीनं रेकॉर्ड डेट 10 जून 2025 निश्चित करण्यात आली आहे. हा लाभांश 2 जुलै 2025 ला शेअरधारकांना दिला जाईल.

टाटा अलेक्सी

टाटा एलेक्सीनं 10 रुपयांच्या दर्शनी मुल्यावर प्रति शेअर 75 रुपयांच्या लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीनं रेकॉर्ड डेट 11 जून 2025  निश्चित करण्यात आली आहे.  पात्र गुंतवणूकदारांना 30 जून 2025 पर्यंत लाभांश दिला जाईल.

रालिस इंडिया

रैलिस इंडिया या टाटा समुहाच्या कंपनीनं 1 रुपयांच्या दर्शनी किंमतीवर 2.50 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. रेकॉर्ड डेट 5 जून 2025 निश्चित करण्यात आली आहे. लाभांश 25 जून नंतर दिला जाईल. या कंपनी एजीएम 23 जून 2025 रोजी होणार आहे.

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सनं आर्थिक वर्ष 2024-25 साठी 2 रुपयांच्या दर्शनी किंमतीवर 6 रुपयांचा अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. लाभांश 24 जून 2025 ला शेअरधारकांना मिळेल.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.