हिंदुस्थानने तिरंगी मालिका जिंकली, श्रीलंकेला चोपून काढल्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तिरंगी मालिकेत IPL 2026 गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर साऱ्या जगाच्या नजरा खिळल्या होत्या. संपूर्ण मालिकेत शांत राहिलेली त्याची बॅट अंतिम सामन्यात तळपली आणि त्याने 29 चेंडूंमध्ये 324 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने 94 धावांची वादळी खेळी केली. या सामन्यात हिंदुस्थाना ‘ए’ संघाने श्रीलंका ‘ए’ संघाचा 66 धावांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. वैभव सूर्यवंशीच्या या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

सामनावीराचा पुरस्कार घेतल्यानंतर वैभव सूर्यवंशीला काही प्रश्न विचारण्यात आले. अंतिम सामना खेळताना माझ्यावर अजिबात दडपण नव्हते, असं वैभव म्हणाला. तो म्हणाला, “मी कोणत्याही दबावाखाली नव्हतो, परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये ज्या योजना अपयशी ठरत होत्या, त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करत होतो. मी याविषयी आमच्या प्रशिक्षकांशी चर्चा केली आणि सरावादरम्यान त्यावर मेहनत घेतली. आज ती रणनीती अचूक ठरली आणि त्याचा निकाल सर्वांसमोर आहे.” या सामन्याबाबत अधिक बोलताना त्याने सांगितले की, त्याने फार विचार केला नव्हता. सुरुवातीच्या 10 षटकांचा पुरेपूर फायदा उठवणे आणि ठरवलेली योजना मैदानावर योग्य पद्धतीने अंमलात आणणे एवढेच त्याचे लक्ष्य होते.

या संपूर्ण मालिकेतून काय शिकायला मिळाले, असे विचारले असता वैभवने हसतमुख स्वरात आपल्या अनुभवांबद्दल सांगितले. तो म्हणाला की, या मालिकेने त्याला खूप काही शिकवले आहे, परंतु अनेकांना कदाचित ठाऊक नसेल की तो आधीच मोठ्या प्रमाणावर 50 षटकांचे क्रिकेट खेळला आहे. प्रत्येक सामन्यातील वेगवेगळ्या परिस्थिती आणि बदलत्या खेळपट्ट्यांवर खेळणे हा एक वेगळा आणि आव्हानात्मक अनुभव होता. मात्र, अशा स्पर्धांमध्ये खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि एकंदरीत ही मालिका आपल्यासाठी अत्यंत मोलाची ठरली, असेही त्याने नमूद केले.

Comments are closed.