आयसीसी वार्षिक क्रमवारीत टीम इंडियाचे वर्चस्व कायम, पाकिस्तानला मोठा फटका

जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा डंका वाजत आहे. आयसीसी (ICC) च्या ताज्या वार्षिक क्रमवारीत टीम इंडियाने एकदिवसीय (ODI) आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखत जगाला आपल्या ताकदीची जाणीव करून दिली आहे. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असला, तरी मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये आपले वर्चस्व टिकवून ठेवणे ही भारतीय क्रिकेटसाठी मोठी उपलब्धी आहे.

​आयसीसीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वार्षिक क्रमवारीत भारताने पुरुष एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी सलग दुसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनल्यानंतर, टी-२० मध्ये भारताचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे. टी-२० क्रमवारीत भारतीय संघ २७५ रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. २६२ रेटिंग पॉइंट्ससह इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे, तर २५८ रेटिंगसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.

​एकदिवसीय (ODI) क्रमवारीतही भारताने आपले अव्वल स्थान सोडलेले नाही. टीम इंडियाचे आता ११८ रेटिंग पॉइंट्स आहेत, जे पूर्वीपेक्षा एक पॉइंटने कमी झाले असले तरी, भारत दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडपेक्षा पाच पॉइंट्सनी पुढे आहे. न्यूझीलंडचे ११३ पॉइंट्स आहेत, तर ऑस्ट्रेलिया १०९ पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेत पाकिस्तानला मागे टाकले असून चौथे स्थान पटकावले आहे. श्रीलंका सहाव्या स्थानावर कायम आहे. अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे ७ व्या, ८ व्या, ९ व्या आणि १० व्या स्थानावर आहेत.

​कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम आहे. ऑस्ट्रेलियन संघ १३१ रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे, तर विद्यमान जागतिक कसोटी विजेता दक्षिण आफ्रिका ११९ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. भारताने नक्कीच एक स्थान वर झेप घेतली असून आता १०४ रेटिंग पॉइंट्ससह संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. १०२ रेटिंग पॉइंट्ससह इंग्लंड चौथ्या स्थानावर घसरला आहे. ताज्या वार्षिक क्रमवारीत पाकिस्तानलाही फायदा झाला असून पाकिस्तान ८९ रेटिंग पॉइंट्ससह श्रीलंकेच्या पुढे गेला आहे. वेस्ट इंडिज ८ व्या, बांगलादेश ९ व्या आणि झिम्बाब्वे १० व्या स्थानावर आहे.

​आयसीसीची ही वार्षिक क्रमवारी मे २०२५ नंतर खेळल्या गेलेल्या सामन्यांना १०० टक्के वेटेज आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षांतील सामन्यांना ५० टक्के वेटेज देऊन तयार करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आगामी द्विपक्षीय मालिका आणि आयसीसी स्पर्धा क्रमवारीत मोठे बदल घडवून आणू शकतात.

Comments are closed.