टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं, गंभीरचं ट्विट व्हायरल, सचिनपासून रोहितपर्यंत कोण कायम्हणाले?


भारतीय क्रिकेटपटूंनी टीम इंडियाचा विजय साजरा केला: महिला वनडे विश्वचषक 2025 च्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, जे सध्या ऑस्ट्रेलियात आहेत, त्यांनीही नवी मुंबईत झालेल्या या विक्रमी विजयावर प्रतिक्रिया देत महिला टीमचं अभिनंदन केलं आहे. भारताने सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जनं अफलातून खेळी करत सर्वांची मने जिंकली.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं अप्रतिम खेळ करत कंगारूंना नमवले. भारताच्या या विजयाचा जल्लोष देशभरात सुरू आहे. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांसह अनेक माजी आणि विद्यमान खेळाडूंनी भारतीय महिला संघाला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

भारतीय क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर लिहिलं, “शानदार विजय! जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी पुढे येऊन अप्रतिम फलंदाजी केली. श्री चर्णी आणि दीप्ती शर्मानंही गोलंदाजीत उत्कृष्ट साथ दिली. तिरंगा असाच उंच फडकवत राहा!”

गौतम गंभीरचं ट्विट व्हायरल, रोहित शर्माचाही मेसेज

टीम इंडियाचे पुरुष संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “जोपर्यंत शेवट होत नाही, तोपर्यंत काहीच संपलेलं नसतं! जबरदस्त खेळलात तुम्ही सर्वांनी. आता अंतिम लढाई बाकी आहे.” माजी कर्णधार रोहित शर्मानं उपांत्य सामना संपताच जेमिमा रॉड्रिग्ज आणि अमनजोत कौरच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत लिहिलं की, “शाब्बास, टीम इंडिया…”

मिताली राजचा भावनिक संदेश

भारताच्या माजी कर्णधार मिताली राज हिने टीमच्या कामगिरीचं कौतुक करत लिहिलं की, “अशा रात्री सांगतात की आपण हा खेळ का खेळतो. विजयासाठीचा विश्वास, जिद्द आणि भूक या तिन्ही गोष्टी आज दिसून आल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टॉप-क्लास परफॉर्मन्ससाठी आणि वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन.”


हे ही वाचा –

ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा घमेंड गुडघ्यावर आणला, जेमिमा रॉड्रिग्ज निधड्या छातीने लढली, मॅच जिंकली आणि ढसाढसा रडली, पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.