हत्येच्या ताज्या घटनांनंतर मणिपूरमध्ये तणाव

पाच जिल्ह्यात बंद : जंगलभागात एका कुकीची हत्या, सहा घरे जाळली

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमध्ये मंगळवारी कांगपोकपी येथे सशस्त्र हल्लेखोरांनी 45 वर्षीय कुकी नागरिक पाओलेन खोंगसाई यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते बांबूचे कोंब गोळा करण्यासाठी जंगलात गेले होते. याचदरम्यान उखरुलमध्ये कुकी समाजाची सहा घरे जाळण्यात आली. सोमवारी तीन मैतेई पुरुषांच्या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी 48 तासांचा बंद पाळण्यात आला. बुधवारीही बंद सुरू राहिल्याने त्याचा दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला होता. तसेच कडक सुरक्षा असतानाही बऱ्याच भागात तणावाचे वातावरण कायम असल्याचे दिसत होते.

मणिपूरमधील हिंसाचार कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. बंदमुळे पाच जिह्यांमध्ये बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये आणि वाहतूक विस्कळीत राहिली. इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, विष्णुपूर, थौबल आणि काकचिंग येथील बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापने बंद राहिली. सार्वजनिक वाहतूकही थांबवण्यात आली होती, मात्र काही खासगी वाहने धावताना दिसली. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला. याप्रसंगी विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली. मणिपूरमध्ये शनिवार ते सोमवार दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे मैतेई, कुकी, नागा आणि पांगल समुदाय आमने-सामने आले. या तणावाचा परिणाम नेपाळी समुदायावरही झाला.

कांगपोकपी जिह्यात मंगळवारी सकाळी कुकी समुदायाचे सदस्य असलेल्या पाओलेन खोंगसाई यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते पी मोल्डिंग गावातील सहकाऱ्यासोबत बांबूचे कोंब गोळा करण्यासाठी जंगलात गेले असतान अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचा सहकारी या हल्ल्यातून निसटण्यात यशस्वी झाला. या हत्येच्या निषेधार्थ, आदिवासी ऐक्य समितीने 24 तासांच्या बंदची हाक दिली होती. यापूर्वी सोमवारी त्याच जिह्यातील सुनरोक परिसरात लाकूडफाटा गोळा करणाऱ्या मैतेई समुदायाच्या 14 जणांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. या गोळीबारात तीन जण ठार झाले होते.

Comments are closed.