दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली आहे.

मोठ्या हल्ल्यांऐवजी छोटे हल्ले करून पळून जाण्याचे कट-कारस्थान : सुरक्षा यंत्रणा सतर्क

वृत्तसंस्था, जम्मू

जम्मू काश्मीरमधील पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या रणनीतीत बदल झाल्याचे गुप्तचर अहवालातून स्पष्ट झाले आहे. दहशतवादी संघटनांनी सध्या मोठ्या हल्ल्यांऐवजी लहान आणि तुरळक हल्ले करून पळून जाण्याचे धोरण अवलंबले आहे. दहशतवाद्यांच्या या बदलत्या रणनीतीमुळे सुरक्षा यंत्रणांनी केवळ काश्मीर खोऱ्यातच नव्हे, तर जम्मू प्रांताच्या उंच पर्वतीय प्रदेशातही दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्या आहेत.

काश्मीरस्थित दहशतवादी संघटनांकडून तीन स्तरांवर हल्ल्यांचे कट-कारस्थान रचले जात असल्याचे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. आपले जाळे विस्तारण्यासाठी संघटनांनी ऑनलाईन प्रचार सुरू केला आहे. या प्रचारातून नवीन स्थानिक तरुणांची भरती सुरू करून छोटे हल्ले करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे गुप्तचर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रक्रियेत आता ज्या तरुणांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही किंवा पोलीस तक्रार नोंद नाही अशा तरुणांना डिजिटल माध्यमांचा वापर करून लक्ष्य केले जात आहे. भरती झालेल्या तरुणांशी नेटवर्कच्या अनेक सदस्यांमार्फत संपर्क साधला जातो आणि त्यानंतर त्यांना शस्त्रs व हल्ल्याची जबाबदारी दिली जाते. तसेच कोणत्याही ठिकाणी हल्ले करताना त्यात पुरेसे अंतर ठेवण्याची योजना आहे. सुरक्षा यंत्रणांच्या निगराणीतून सुटण्याचा हा एक प्रयत्न असल्याचा गुप्तचर विभागाचा संशय आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या मते, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित गट स्थानिक पोलीस, काश्मिरी हिंदू आणि स्थलांतरित कामगारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. युनायटेड लिबरेशन कौन्सिलच्या नावाने ऑनलाईन धमक्या आणि प्रचाराच्या मोहिमा देखील चालवल्या जात आहेत. या कारस्थानांचा उद्देश लोकांमध्ये भीती निर्माण करणे आणि तरुणांना कट्टरतावाद व दहशतवादी भरतीकडे ढकलणे हा आहे. त्याचबरोबर मोठ्या हल्ल्यांच्या तयारीसाठी पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भीतीही अधिकाऱ्यांना वाटत आहे. तूर्तास छोटे हल्ले आणि प्रचाराद्वारे खोऱ्यात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न दहशतवादी संघटनांकडून केले जाऊ शकतात.

सुरक्षा दलांनाही घातपाताचा धोका

अलीकडील धमक्यांमध्ये काश्मिरी हिंदूंसोबतच महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. विविध समुदायांमधील अविश्वास वाढवणे आणि सामाजिक तणाव निर्माण करणे हा या मोहिमेचा एक भाग असू शकतो. या कटादरम्यान दहशतवादी जम्मू प्रांताच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या अल्पसंख्याकांना लक्ष्य करू शकतात. तसेच ते सुरक्षा दलांवर घातपाती हल्ल्याचा वापर करू शकतात, असा इशाराही गुप्तचर विभागाकडून देण्यात आला आहे.

सीमारेषेवर अधिक सतर्कता

गुप्तचर विभागाने दिलेल्या इनपुट्सनंतर सुरक्षा यंत्रणा आता ऑनलाईन हालचाली, दहशतवाद्यांची भरती प्रक्रिया आणि शस्त्र वाहतुकीशी संबंधित नेटवर्कवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय लष्करासह स्थानिक पोलीस दल आता सतर्क झाले असून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी संयुक्त मोहिमा राबविल्या जात आहेत. तसेच पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवरील जवानांना अधिक सतर्क करण्यात आले आहे.

दहशतवादी संघटनांकडून लहान हल्ल्यांनाच प्राधान्य

ऑनलाईन प्रचार, स्थानिक तरुणांच्या भरतीचे प्रयत्न

भारतीय सुरक्षा यंत्रणा हल्ले रोखण्यासाठी प्रयत्नशील

Comments are closed.