सोशल मीडियावरही थलपती विजयचा जलवा; मुख्यमंत्री होताच सरकारी हँडल्सचे फॉलोअर्स वाढले
अभिनेता ते राजकीय नेता असा प्रवास करणारे थलपती विजय यांनी नुकतीच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे पडसाद केवळ स्टेडियमपुरते मर्यादित न राहता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात उमटले आहेत. अनेक वर्षे तामिळनाडूच्या बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवल्यानंतर, आता विजय यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू सरकार सोशल मीडिया ट्रेंड्समध्येही अव्वल स्थानी पोहोचले आहे.
विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच राज्य सरकारच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरील फॉलोअर्स आणि व्ह्यूजच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ‘एक्स’ हँडलवर यापूर्वी केवळ 4 लाख फॉलोअर्स होते, ही संख्या आता झपाट्याने वाढून 20 लाखांवर पोहोचली आहे. अशीच काहीशी परिस्थिती राज्य सरकारच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरही पाहायला मिळाली, जिथे फॉलोअर्सचा आकडा रातोरात 4 लाखांवरून 20 लाखांच्या पुढे गेला आहे.
चेन्नईतील नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडित काढले आहेत. तामिळनाडू माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या यूट्यूब चॅनलवर या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाला तब्बल 2 लाख 80 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेल्या विजय यांच्या एका सिंगल फोटोने सोशल मीडियावर 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवत इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
Comments are closed.