तामिळनाडूत थलपथी विजय यांचे सरकार कोसळणार आहे.

द्रमुक अध्यक्ष स्टॅलिन यांचा मोठा दावा

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूतील मुख्यमंत्री थलपति विजय यांच्या सरकारवरून द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी अत्यंत मोठा दावा केला आहे. विजय यांचे सरकार अत्यंत लवकरच कोसळू शकते आणि राज्यात मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते असे स्टॅलिन यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले आहे.

विजय यांच्या सरकारकडे बहुमत नाही आणि पुढील 3-6 महिन्यांच्या आत राज्यात विधानसभा निवडणूक पुन्हा होऊ शकते. टीव्हीके सरकार स्वबळावर नव्हे तर द्रमुक आघाडीच्या माजी घटकपक्षांच्या समर्थनाने तरले आहे. राज्यात 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी निवडणूक होऊ शकते, कारण वर्तमान सरकार स्वबळावर बहुमत मिळवू शकलेले नाही. बहुमताचा अर्थ 234 सदस्यीय सभागृहात 118 जागा प्राप्त करणे आहे, परंतु विजय यांच्या पक्षाला केवळ 108 जागा जिंकता आल्या आहेत असा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांनी तयार रहावे

आगामी निवडणूक पाहता द्रमुक कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या मोडमध्ये राहण्याची आवश्यकता आहे. टीव्हीके सरकारचे इंजिन कुठे थांबेल हे कुणीच जाणत नाही. निवडणूक कुठल्याही क्षणी, कुठल्याही स्थितीत होऊ शकतात, आम्हाला याकरता 100 टक्के तयार रहावे लागेल असे स्टॅलिन यांनी सभेला संबोधित करताना म्हटले आहे.

कायदा-सुव्यवस्थेवरून कोंडी

राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून महिला आणि मुलांच्या विरोधातील गुन्हे वाढले आहेत. राज्यात अघोषित वीज भारनियमन सुरू झाले आहे. राज्य सरकारच्या खराब धोरणांमुळे मोठमोठे उद्योग तामिळनाडूतून बाहेर पडत इतर राज्यांमध्ये जात असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला.

Comments are closed.