मुंबईतील घटनेचा प्रशासनाने घेतला धसका, ठाण्यातील २ लाख मॅनहोलची झाडाझडती, प्रत्येक प्रभागात तपासणीसाठी महापालिकेचे पथक
मुंबईतील घटनेचा ठाणे महापालिकेने धसका घेतला असून शहरातील तब्बल २ लाख मॅनहोलची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. आजपासून प्रत्येक प्रभागात मॅनहोलच्या तपासणीसाठी पालिका प्रशासनाने पथक नेमले आहे. या पथकाकडून प्रत्येक प्रभागात, महामार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या मॅनहोलची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. आवश्यक असल्यास ऑन दि स्पॉट नादुरुस्त मॅनहोलची कामेदेखील केली जाणार आहेत.
मुंबईमधील साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय असलम शेख यांचा गुरुवारी मृत्यू झाला. भरपावसात सुरू असलेल्या या कामामुळे या घटनेची मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गंभीर दखल घेत पालिकेतील चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे. या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनातदेखील उमटले आहेत. या घटनेनंतर आता ठाणे महापालिकादेखील धास्तावली असून शहरातील सर्व मॅनहोल तत्काळ तपासणीचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत ड्रेनेज आणि गटारे असे मिळून एकूण २ लाख ४८ हजार १३६ मॅनहोल आहेत. या सर्व मॅनहोलच्या तपासणीला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
१ हजार ३५१ झाकणे बदलली
ठाणे महापालिका क्षेत्रात मॅनहोलची संख्या जास्त आहे. एरवी या मॅनहोलकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठाणे महापालिकेने मुंबईच्या घटनेनंतर गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या मॅनहोलवर जाळ्या नाहीत किंवा ज्या मॅनहोलला दुरुस्तीची आवश्यकता आहे, अशांचा मॅनहोल अहवाल तयार करून तत्काळ दुरुस्तीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या प्रत्येक ९ प्रभाग समितीमधील ड्रेनेज तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंता गल्लीबोळात फिरत आहेत. येत्या ३ दिवसांत शहरातील सर्व मॅनहोल सुस्थितीत करण्यात येणार आहेत.
नादुरुस्त तसेच तुटलेले मॅनहोल तत्काळ दुरुस्ती करून त्यावर नवीन झाकणे बसवण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना हे मॅनहोल पटकन निदर्शनास यावेत यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत १ हजार ३५१ मॅनहोलची दुरुस्ती तसेच झाकणे बदलण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पालिकेचे अधिकारी रस्त्यावर उतरले असून ठाणे महापालिका आता अलर्ट मोडवर आली आहे. प्रभाग समिती स्तरावर त्या त्या अभियंत्यांच्या माध्यमातून तत्काळ कारवाई करण्यात येत आहे.
Comments are closed.