केतनला मारण्यासाठी सिया-चेतनच्या प्लॅनिंगचा आणखी भाग समोर? सियाचं मैत्रिणीसोबतचं चॅट उघड, लग्न

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता होणारी पत्नी सिया गोयल हत्येचा कट रचताना करत असलेलं एक प्लॅनिंग समोर (Ketan Agrawal death Case) आलं आहे. केतनशी लग्न करायचं नसलं तरी हत्येच्या कटाचा कोणाला संशय येऊ नये म्हणून ती विमान तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्ड मागून घेत होती. सियाचे यासंदर्भात तिच्या मैत्रिणींसोबतचे कथित चॅट समोर आलं आहे. स्नॅपचॅट वरती ती एका मैत्रिणीला तिने आधार कार्डचा (Ketan Agrawal death Case) फोटो मागितला. “जे लग्न होणार नाही, त्या लग्नाला जायचे तिकीट बुक करण्यासाठी तुझे आधार कार्ड पाठव.” असा सियाचा मैत्रिणीसोबतचा कथित चॅट समोर आली आहे. केतनची हत्या केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सिया आणि चेतनने रचलेल्या प्लॅनिंगचा हा एक भाग होता का? हे पोलीस तपासात आता समोर येईल.(Ketan Agrawal death Case)

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तांत्रिक तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुन्हा मिळवला (Recover) आहे. या डेटामधून धक्कादायक बाबी समोर आल्या असून, दोन्ही आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी एकमेकांशी अत्यंत गुप्त आणि सांकेतिक भाषेत (Code Words) तसेच टोपणनावांचा वापर करून संवाद साधल्याचे उघड झाले आहे.(Ketan Agrawal death Case)

Ketan Agrawal Case : बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद

या सांकेतिक संभाषणाचा नेमका अर्थ काय आणि त्याचा या खुनाच्या कटाशी काय संबंध आहे, हे शोधण्यासाठी दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून कसून चौकशी करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील राजश्री वीरकुड यांनी न्यायालयात केला. याकरिता पोलिसांना दोन्ही आरोपींची कस्टडी हवी होती. मात्र, दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंग यांनी याला विरोध केला. तांत्रिक तपास आणि डेटा रिकव्हरीसाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याची कोणतीही कायदेशीर आवश्यकता नाही, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर मांडला.

Ketan Agrawal Case : आरोपींच्या वर्तुळातील तरुणांची चौकशी सुरू

दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. चेतन आणि सिया यांच्या संपर्कात असलेल्या अनेक मित्रमैत्रिणींचे आणि इतर तरुणांचे जबाब पुणे ग्रामीण पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. या संशयित चॅटिंगची पडताळणी करत असतानाच, या दोघांच्या निकटवर्तीयांकडून हत्येच्या कटाशी संबंधित आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Ketan Agrawal Case : बीडच्या मित्राने दिला होता खुनाचा बेत रद्द करण्याचा सल्ला?

तपासादरम्यान सर्वात मोठा खुलासा चेतन चौधरीच्या एका वर्गमित्राबाबत झाला आहे. मूळचा बीडचा असलेला हा तरुण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आरोपी चेतनच्या सतत संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे, केतन अग्रवाल यांच्या हत्येच्या संपूर्ण कटाची पूर्वकल्पना या मित्राला होती. मात्र, त्याने या गुन्ह्यात भाग न घेता उलट चेतन आणि सिया या दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला होता. “केतनचा जीव घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका,” असे सांगून त्याने दोघांना या कृत्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आता समोर येत आहे.

Ketan Agrawal Case : नार्को चाचणीचा विषय तूर्तास निकाली

न्यायालयात सुनावणी दरम्यान दोन्ही आरोपींची नार्को चाचणी (Narco Analysis Test) करण्याचा मुद्दाही उपस्थित झाला होता. मात्र, कोणत्याही आरोपीच्या संमतीशिवाय त्याची नार्को चाचणी घेता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर सरकारी वकिलांनीही सध्याच्या तपास चक्रात नार्को चाचणीची तातडीने गरज नसल्याचे न्यायालयाला सांगितले. परिणामी, आरोपींच्या नार्को चाचणीचा विषय तूर्तास मागे पडला आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.