मुरबाडमध्ये ‘वैशाख वणवा’.. 54 गावपाड्यांत पाणीबाणी; जलजीवन मिशन योजनेचे तीनतेरा, हंडाभर पाण्यासाठी माता-भगिनींची पायपीट
<< गोपाळ पवार
आदिवासीबहुल तालुका असलेल्या मुरबाडमध्ये ऐन वैशाख वणव्यात 54 गावपाड्यांमध्ये ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे. सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचे तीनतेरा वाजल्याने हंडाभर पाण्यासाठी माता-भगिनींना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. मुरबाडमधील 22 गावे व 34 पाड्यांना पाणीटंचाईचे चटके बसत असून जलजीवन मिशन योजनेंतर्गत 40 योजना पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या योजनेची पुरती वाट लागली आहे. मुरबाडमधील काही पाड्यांमध्ये तर खड्ड्यातून पाणी काढण्याची वेळ आली असून मुरबाडकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई कायमची दूर होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
कोट्यवधी रुपये कुणाच्या घशात गेले?
मुरबाड तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत 40 योजना पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. पण या योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून या योजनेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये नेमके कुणाच्या घशात गेले, असा सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला केला आहे. लवकरात लवकर पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी मुरबाडवासीयांनी केली आहे.
मुरबाडमधील मिल्हे, गणेशपूर, कोळीवाडा, सावरेची वाडी येथे बैलगाडीतून पाण्याची पिंपे आणली जातात. त्यासाठी एका पिंपामागे शंभर रुपये मोजावे लागत असल्याची माहिती स्थानिक समाजसेवक पंढरीनाथ घावट यांनी दिली.
शासनाने दीड कोटी रुपयांची पाणी योजना जलजीवन मिशन अंतर्गत तयार केली होती. पण ती प्रत्यक्षात अपयशी ठरली असून अडीच हजार लोकवस्ती असलेल्या गावांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
मिल्हे, गणेशपूर, कोळीवाडा, सावरेची वाडी येथील महिलांनी गेल्या वर्षी पंचायत समितीवर हंडामोर्चा काढला होता. विहीर खोदून पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण अजूनही कोणतीही हालचाल झालेली नाही.
मुरबाड हा नेहमीच विकासापासून दूर असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. गावपाड्यांपर्यंत रस्तेही व्यवस्थित नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाईला सुरुवात होते. यावर्षीही प्रशासनाने मुरबाडसाठी टंचाई आराखडा तयार केला असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तोंडली-तोडलीपाडा, वाधवाडी, दिवानपाडा, साकुर्लीवाडी येथे सध्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. त्यातच भर म्हणून माळशेज हायवेवर काम करत असलेल्या ठेकेदाराने महसूल विभागाच्या संगनमताने नदीचे पाणी आपल्या कामासाठी वळवले आहे. त्यामुळे नदीचे पात्र कोरडे ठाक पडले असून पाणीटंचाईच्या झळा वन्यजीवांनाही बसत आहे.
Comments are closed.