पडद्याआडून – ठरलंय फॉरेव्हर; तजेलदार, सुगंधित प्रेमचाफा

>> पराग खोत

मराठी रंगभूमीवर नवनव्या प्रयोगांची परंपरा जुनी असली तरी प्रत्येक पिढीला आपला आवाज शोधावा लागतो. आजच्या डिजिटल, वेगवान आणि भावनिकदृष्टय़ा गुंतागुंतीच्या काळात त्या आवाजाची अभिव्यक्ती वेगळ्या पद्धतीने होणं साहजिक आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘ठरलंय  फॉरेव्हर’ हे नाटक रंगभूमीवर आलंय. चौकटीबाहेरचं, धाडसी आणि थेट तरुण पिढीशी संवाद साधणारं. हे नाटक तरुणांचं असलं तरी ते सर्वच प्रेक्षकांना भावतं हे विशेष.

या नाटकाची कथा जितकी रोचक, तितकीच समकालीन आहे. अबीर हा एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. तो एका शोमध्ये लाइव्ह परफॉर्म करत असताना, अचानक त्याच्या आयुष्यातून सात वर्षांपूर्वी अदृश्य झालेली मीरा देसाई पालकर त्याच्यासमोर उभी राहते. ‘घोस्टिंग’सारख्या आजच्या नात्यांमध्ये सहजपणे वापरल्या जाणाऱया संकल्पनेला नाटकात एक भावनिक आणि नाटय़मय संदर्भ दिला आहे. लॉस एंजेलिसहून परतलेली मीरा तिचा अपूर्ण राहिलेला एक चित्रपट पूर्ण करण्यासाठी आलीय; मात्र सात वर्षांपूर्वी दोघांनी एकत्र लिहायला घेतलेल्या कथेला पूर्णत्वाला नेण्यासाठी तिला अबीरच्या ‘नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ची गरज भासते.

ही केवळ व्यावसायिक गरज म्हणून सुरू झालेली भेट हळूहळू त्यांच्या अपूर्ण भूतकाळाशी भिडणाऱया संघर्षात परिवर्तित होते. नात्यांमधील न सांगितलेल्या गोष्टी, तुटलेले संवाद आणि न सोडवलेले प्रश्न यांची ही कहाणी आहे. विशेष म्हणजे, या कथेला एक वेगळा आयाम देणारी तिसरी व्यक्तिरेखा म्हणजे स्वतः नाटककार, एक ‘मेटा-नरेटर’. हे पात्र जणू नाटकाचा अंतरात्माच होऊन प्रेक्षकांसमोर एक मूलभूत प्रश्न ठेवतं. एकेकाळी एकमेकांवर खरं प्रेम केलेल्या आणि काळाच्या ओघात ते गमावलेल्या दोन व्यक्ती फक्त एक स्क्रिप्टच नव्हे, तर त्यांची अपूर्ण कथाही एकत्रितपणे नव्याने लिहू शकतील का?

हे नाटक केवळ कथानकापुरतं मर्यादित राहत नाही, तर त्याच्या सादरीकरणातही नवतेचा शोध घेतं. द्विभाषिक संवाद, गाणी आणि नृत्य तसंच व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा अफलातून वापर यांचा संगम या नाटकात पाहायला मिळतो. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर प्रथमच एलईडी स्क्रीनचा पार्श्वभूमी म्हणून एवढा परिणामकारक वापर करून दृश्यात्मकतेला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हे नाटक केवळ ऐकण्याचा नाही, तर अनुभवण्याचा एक दृकश्राव्य प्रवास ठरतं. या नाटकाची आणखी एक खासियत म्हणजे, त्याची ‘वेस्टर्न’ शैली. पारंपरिक प्रेमकथांच्या चौकटी मोडत, ही कथा कोणत्याही साचेबद्ध फॉर्म्युल्यात बसत नाही. यात ना नेहमीचा प्रेमभंग आहे, ना प्रेमाचा त्रिकोण. उलट, ही कथा नात्यांच्या गुंतागुंतीकडे अधिक वास्तववादी आणि आधुनिक दृष्टिकोनातून पाहते. तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱया या कथेत टेक्नॉलॉजी हे चौथे पात्र म्हणून येतं. ते कसं? हे प्रत्यक्ष पाहणं मनोरंजक आहे.

या नाटकात अनेक ट्विस्ट्स अॅण्ड टर्न्स आहेत तसंच काही गोंधळवून टाकणारे संदर्भही आहेत. तसंच हे नाटक इतपं वेगवान आहे की, हे संदर्भ प्रत्येकाला नीट लागतीलच असं नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन काही गोष्टी अधिक सुटसुटीत करायला हव्या होत्या. मात्र ज्या पद्धतीने हे सगळं नाटकात खेळवलं आहे ते निव्वळ अप्रतिम आणि याचं मुख्य श्रेय जातं लेखिका अक्षता आचार्य हिला. नाटकाच्या सुरुवातीलाच वेगळा फॉर्म वापरून तिने याची चुणूक दाखवलीय. तसंच या नाटकाची भाषा सौष्ठवपूर्ण आहे. तरुण पिढीचं असूनही इथलं मराठी आणि इंग्रजीसुद्धा दृष्ट लागेल असं आहे. संवाद चटपटीत आहेत आणि इथला विनोद निखळ आहे. तितकेच या नाटकातले हळवे प्रसंग सर्वस्पर्शी झालेयत. तरुणांना हे आपलंच आयुष्य बघतोय असं वाटेल, तर ज्येष्ठांना आपली मुलं आणि नातवंडं समोर दिसतील. मुळात हे नाटक तुमच्या मूल्यांना धक्का देत नाही. यात सवंग विनोद किंवा सूचक द्वय़र्थी संवाद नाहीत. थिल्लर आणि अश्लील विनोदाच्या सध्याच्या ‘समयी’ इतपं संयमित आणि तरीही मुक्त विचारांचं नाटक घेऊन आल्याबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन!

अक्षता आचार्य, कपिल रेडेकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन केलंय ऋषी मनोहर याने. 2018 मध्ये ‘दादा, एक गूड न्यूज आहे!’ या नाटकात एकत्र काम केल्यानंतर ऋता आणि ऋषी ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र आलीय ती अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून. गेल्या दशकभर सतत प्रयोगशील राहिलेल्या ऋषीसमोर आता स्वतःचं नाटक सादर करण्याचं मोठं आव्हान होतं आणि त्यात तो यशस्वी ठरलाय. परंतु हे नाटक खूपच खर्चिक झालं असणार हे नक्की. त्याचं नेपथ्य, एलईडीचा वापर आणि इतर निर्मिती मूल्यं अतिशय श्रीमंत आहेत आणि त्याचा अनुभव आपल्याला येतो. तांत्रिक टीमचं काwतुक आहेच, पण मुद्दाम उल्लेख करायचा तो व्हीएफएक्स निर्माण करणाऱया शुभंकर सौंदणकरचा.

हे प्रत्येकाने पाहावं असं नाटक आहे. त्याचे सध्या मोजकेच प्रयोग होत असले तरी लवकरच ते नवी झेप घेईल आणि प्रेक्षक हे नाटक बघायला गर्दी करतील हे नक्की. तरुणांनी, तरुणांसाठी आणलेलं हे नाटक मराठी रंगभूमीवर एक नवा ट्रेंड निर्माण करू शकेल. प्रयोगशीलतेचा धाडसी आविष्कार आणि आधुनिक नात्यांचं प्रामाणिक चित्रण यामुळे  ‘ठरलंय  फॉरेव्हर ’  हे नाटक केवळ एक प्रेमकथा न राहता, आजच्या काळाचं प्रतिबिंब ठरेल यात शंका नाही.

लेखन: अक्षता आचार्य

दिग्दर्शन ः ऋषी मनोहर

कलाकार: अक्षता आचार्य, कपिल रेडेकर आणि ऋता दुर्गुळे

गाणे: सुजय जाधव

संगीत: अनिरुद्ध निमकर

बॅकस्टेज: सुमीत पाटील

प्रकाश योजना: तेजस देवधर

व्हीएफएक्स ः शुभंकर सौंदणकर

निर्माते ः ऋषी मनोहर, कपिल रेडेकर, ऋता दुर्गुळे

सूत्रधार ः नितीन नाईक आणि  प्रणीत बोडके

छायाचित्र सौजन्य ः संजय पेठे

Comments are closed.