काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही!

इंडी आघाडीतील एक पक्ष नाराज

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देण्याकरता अपेक्षेनुसार जोरदार समर्थन न मिळाल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी इंडी आघाडी आणि विशेषकरून काँग्रेसबद्दल तीव्र निराशा व्यक्त केली आहे.  आमचा पक्ष या आघाडीचा प्रतिबद्ध सदस्य आहे, परंतु ही आघाडी अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेली नाही. जम्मू-काश्मीरशी निगडित मुद्द्यांवर मजबूत आणि एकजूट रणनीतिचा अभाव हे आघाडीतील वादाचे मुख्य कारण असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

या राष्ट्रीय आघाडीने आमच्या मुद्द्यासाठी अधिक जोरदारपणे लढा दिलेला नाही हीच आमची सर्वात मोठी नाराजी राहिली आहे. काँग्रेसने आमच्या अपेक्षेनुसार भूमिका बजावलेली नाही हे अत्यंत दु:खद आहे. आघाडी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहू नये, तर देशाच्या भविष्याशी निगडित मुद्द्यांवर चर्चेसाठी अधिक बैठका व्हाव्यात असे आवाहन अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीला केले आहे.

भाजपसोबत जाण्यास नकार

भाजपसोबत आम्ही जाणार नाही हे अत्यंत स्पष्ट आहे. आम्ही इंडी आघाडीचा हिस्सा आहोत. निवडणुकीनंतर ही आघाडी पुन्हा एकजूट होईल आणि केवळ राष्ट्रीय मुद्दे नव्हे तर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यालाही अधिक जोरदारपणे उपस्थित करण्यात येईल अशी अपेक्षा असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. इंडी आघाडीच्या बैठका नियमित स्वरुपात होणे अत्यंत आवश्यक आहे. ही आघाडी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नाही. ही देशाच्या भविष्यासाठी आहे, याच गोष्टीकडे अनेकदा दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा अब्दुल्ला यांनी केला आहे.

राज्याच्या दर्जाचा मुद्दा

विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर केंद्र सरकार जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकार संसदेसोबत सर्वोच्च न्यायालयात देखील जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबद्दल प्रतिबद्ध आहे. आता याकरता सरकार किती वेळ घेईल हे सांगणे अवघड आहे. परंतु मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना आश्वासन देण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आमच्या खासदारांना याकरता विश्वास दिला असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले आहे.

Comments are closed.