शॉटगन वर्ल्ड कप २०१८ स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात होत आहे

वृत्तसंस्था  /नवी दिल्ली :

कझाकस्तानमधील अलमाटी येथे आज शनिवारपासून विविध संघांच्या आगमनाने आयएसएसएफ वर्ल्ड कप शॉटगन स्टेज नेमबाजी स्पर्धा सुरू होत असून भारताचा 12 सदस्यीय शॉटगन संघ त्यात सहभागी झाला आहे.

दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पाच ऑलिम्पिक प्रकार होणार असून त्यात 42 देशांचे 284 नेमबाज सहभागी झाले आहेत. भारतीय संघातील आठ नेमबाज  हे केवळ रँकिंग गुणांसाठी यात खेळणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने दिली. मुख्य स्पर्धेला सोमवारी 4 मेपासून सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी पुरुष व महिलांच्या स्कीट नेमबाजीची पात्रता फेरी घेतली जाईल. या प्रकाराची अंतिम फेरी दुसऱ्या दिवशी मंगळवारी होईल. ट्रॅप नेमबाजी अंतिम फेरीत 9 मे रोजी, ट्रॅप मिश्र सांघिक स्पर्धा पुढील शनिवारी 10 मे रोजी घेतली जाईल. भारताच्या शॉटगन पथकाने गेल्या मार्चमध्ये मोरोक्कोमधील टँजियर येथे झालेल्या स्पर्धेने आंतरराष्ट्रीय मोहिमेला सुरुवात केली होती. टँजियरमध्ये वर्ल्ड कप नेमबाजीचा पहिला टप्पा झाला होता. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मैराज अहमद खान, अनंतजीत सिंग नरुका (पुरुष स्कीट) तर रायझा धिल्लाँ (महिला स्कीट) हे भारताचे तीन ऑलिम्पियन्स खेळताना दिसतील. तिघेही यावर्षी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.

बलाढ्या इटली संघासह भारताला फिनलँड, डेन्मार्क, झेक प्रजासत्ताक, सायप्रस, ग्रीस, पेरू व कतार यांच्या अव्वल नेमबाजांशी स्पर्धा करावी लागणार आहे. यजमान कझाकचा संघही बऱ्यापैकी दर्जेदार असून चीन व रशियाचे नेमबाजही यात सहभागी झाले आहेत. रशियन खेळाडू त्रयस्थ खेळाडू म्हणून खेळणार आहेत. त्यामुळे भारताला या स्पर्धेत तगड्या खेळाडूंशी मुकाबला करावा लागणार आहे.

Comments are closed.