कान्समध्ये 55 वर्षांनंतर प्रदर्शित होणार द डेव्हिल्स, 1971 नंतर पहिल्यांदाच दाखवणार पूर्ण चित्रपट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भयपटांचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग असतो. काही भयपट हे कितीही जुने झाले तरी आजही लक्षात राहतात. 1971 साली प्रदर्शित झालेला ‘द डेव्हिल्स’ हा असाच एक चित्रपट होता. या चित्रपटाने जगभरात खळबळ उडवून दिली होती. चित्रपटातील काही दृश्ये इतकी धक्कादायक मानली गेली की, या चित्रपटावर अनेक देशांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली. प्रदर्शनानंतर त्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली होती. परंतु आता 55 वर्षांनंतर, हा चित्रपट कुठेही काटछाट न होता पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच भयपटाचे चाहते खुश झाले आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक केन रसेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने 1971 मध्ये प्रदर्शित झाल्यावर खळबळ उडवून दिली. त्यातील धार्मिक प्रतीकांचे चित्रण, भयप्रद दृश्ये आणि धाडसी दृश्ये अत्यंत वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे अनेकांनी या चित्रपटाला त्या काळातील सर्वात वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे अनेक भाग काढून टाकण्यात आले, तर काही देशांमध्ये त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

आता, अनेक वर्षांनंतर, प्रेक्षकांना अखेर केन रसेल यांना मूळतः अभिप्रेत असलेली आवृत्ती पाहायला मिळेल. नंतर तो चित्रपटगृहांमध्ये आणि 4K ब्लू-रेवर प्रदर्शित केला जाईल. अमेरिकेत याचे विशेष प्रदर्शन 16 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.

या चित्रपटाची कथा ही 17 व्या शतकातील असून, फ्रान्समध्ये घडते. एका धर्मगुरूवर जादूटोणा आणि दुष्ट आत्म्यांचा आरोप ठेवला जातो. चित्रपटातील भूतबाधा, भीती आणि धार्मिक संघर्षाचे गडद चित्रण प्रभावी मानले जाते. ऑलिव्हर रीड आणि व्हेनेसा रेडग्रे यांचा अभिनय आजही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी अभिनयांपैकी एक मानला जातो. विशेष म्हणजे, या चित्रपटाची एक आवृत्ती 2010 मध्ये थोड्या काळासाठी ऑनलाइन दिसली होती, पण ती लगेचच काढून टाकण्यात आली. असे असूनही, चित्रपटाबद्दलची लोकांची आवड जराही कमी झाली नाही. हळूहळू, ‘द डेव्हिल्स’ हा भयपट सिनेमातील सर्वात प्रशंसित आणि रहस्यमय चित्रपटांपैकी एक बनला. आता, इतक्या वर्षांनंतर, प्रेक्षकांना अखेर तो त्याच्या मूळ स्वरूपात पाहण्याची संधी मिळणार आहे.

Comments are closed.