राष्ट्रपती कार्यालय सहा दिवसांसाठी दिल्लीहून शिमला येथे स्थलांतरित होणार आहे.
द्रौपदी मुर्मू 175 वर्षे जुन्या मातीच्या इमारतीत राहणार
वृत्तसंस्था/ शिमला
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 एप्रिल ते 2 मे या कालावधीत शिमला दौऱ्यावर पोहोचणार असून सहा दिवसांसाठी राष्ट्रपतींचे कार्यालय दिल्लीहून शिमला येथे हलवण्यात येणार आहे. याचे एक कारण म्हणजे, दिल्लीबाहेर राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान फक्त शिमला आणि हैदराबाद येथे आहे. हिमाचल सरकारने राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी जवळपास सर्व तयारी पूर्ण केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहा दिवसांच्या वास्तव्यादरम्यान, राष्ट्रपती भवनातील सर्व महत्त्वाच्या फाईल्स येथे आणल्या जाणार असून राष्ट्रपती सचिवालय सहा दिवस शिमला येथून कार्यरत राहील.
देशात फक्त तीन राष्ट्रपती निवासस्थाने आहेत. यापैकी सर्वात जुने निवासस्थान शिमला येथील माशोब्रामध्ये आहे. पूर्वी ‘द रिट्रीट’ म्हणून ओळखले जाणारे हे निवासस्थान, शिमलापासून 12 किलोमीटर अंतरावर माशोब्राच्या शांत, निसर्गरम्य टेकड्यांमध्ये वसलेले आहे. माशोब्रा येथील राष्ट्रपती निवासस्थान 175 वर्षांहून अधिक जुने आहे. त्याची बांधकाम शैली ‘दज्जी’ प्रकारची असून, भिंती लाकूड आणि मातीच्या बनवलेल्या आहेत. या बांधकाम शैलीचे वैशिष्ट्या म्हणजे या शैलीत बांधलेल्या इमारतीसुद्धा भूकंपरोधक असतात. ही ‘दज्जी’ बांधकाम शैली उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहते.
इमारत आकर्षणाचे केंद्र
माशोब्रा येथील भारताच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानात अनेक आकर्षणे आहेत. येथे एक सुंदर सफरचंदाची बाग आहे. या बागेत विदेशी जातींसह तीनशेहून अधिक सफरचंदाची झाडे आहेत. तसेच येथे एक भव्य ट्यूलिप बाग आहे. तीन वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या ट्यूलिप बागेचे उद्घाटन केले होते. येथे डेन्मार्क, वेलेमार्क, जांबोपीक इत्यादी जातींची सुंदर ट्यूलिप फुले फुलत आहेत. आतील खोल्यांची सुंदर सजावट पाहण्यासारखी आहे. राष्ट्रपतींसाठी एक स्वतंत्र खोली आहे. संपूर्ण इमारतीच्या सभोवताली हिरवळीचे एक सुंदर साम्राज्य असून तेथून सभोवतालचे 360 अंशांचे दृश्य दिसते.
3 मे पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुले
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचे निवासस्थान माशोब्रा सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. आता राष्ट्रपतींचा दौरा संपल्यानंतर 3 मे पासून ते उघडले जाईल. विद्यमान राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार तीन वर्षांपूर्वी राष्ट्रपतींचे निवासस्थान माशोब्रा सामान्य जनता आणि पर्यटकांसाठी उघडण्यात आले होते. पर्यटक तिकीट खरेदी करून येथे भेट देऊ शकतात.
Comments are closed.