यशच्या टाॅक्सिक सिनेमाचे प्रदर्शन पुन्हा एकदा लांबणीवर
कन्नड सुपरस्टार यशच्या टाॅक्सिक चित्रपटाची फॅन्स खूप आतुरतने वाट पाहात आहेत. ‘केजीएफ’ चित्रपटानंतर येणारा हा चित्रपट असल्याने, फॅन्सच्या यशकडून अपेक्षा वाढल्या आहेत. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने आधीच मोठ्या प्रमाणात हवा निर्माण केली आहे. यशसाठी हा सिनेमा फार महत्त्वाचा मानला जातो. या चित्रपटाची कथा कुठेही लीक न होऊ देण्याची खबरदारी यश आणि निर्मात्यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे.
नुकतेच यशने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट प्रसिद्ध करून जाहीर केले आहे की, त्याचा आगामी चित्रपट ‘टॉक्सिक’ ४ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार नाही. तो आता जागतिक बाजारपेठेनुसार प्रदर्शनाची तारीख बदलणार आहे. सिनेमाकॉन २०२६ मध्ये ‘टॉक्सिक’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे यशने हा निर्णय घेतला आहे. यशने पोस्ट टाकल्यानंतर, आता फॅन्सची चांगलीच निराशा झालेली आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार पोस्टमध्ये यशने लिहिले, “आपण काही चित्रपट तयार करतो, परंतु काही चित्रपट मात्र आपल्याला सदैव आठवण करुन देतात की, आपण त्या सिनेमाच्या प्रेमात का पडलो. ‘टॉक्सिक’ हा असाच एक चित्रपट आहे.” सिनेमाकॉनमध्ये आमच्या या चित्रपटाला जगभरातून प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्हाला खात्री पटली आहे की, हा चित्रपट जगासमोर येण्यास आता सज्ज आहे.
‘टॉक्सिक’चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सध्या आम्ही जगभरातील चांगल्या वितरक आणि भागीदारांसोबत काही चर्चेमध्ये व्यस्त आहोत. याच कारणास्तव चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख थोडी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही आता ४ जून रोजी चित्रपट प्रदर्शित करणार नाही. आम्ही तो नंतर, जागतिक प्रेक्षकांना अनुकूल अशा अधिक चांगल्या तारखेला प्रदर्शित करू. ‘टॉक्सिक’ लवकरच जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
यशचा असाही विश्वास आहे की, ‘टॉक्सिक’ हा एक असा चित्रपट आहे जो हिंदुस्थानी चित्रपटाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देईल. त्यामुळे, त्याला आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घाई करायची नाही. अभिनेत्याने लिहिले, “आजकाल हिंदुस्थानची चित्रपटसृष्टी स्वतःची ओळख निर्माण करत आहे आणि जगासमोर खंबीरपणे उभी आहे. अशा काळात, आपला दर्जा उंचावणे ही आपली जबाबदारी आहे. एक अभिनेता-निर्माता म्हणून, मला आपल्या चित्रपटसृष्टीत योगदान देण्याची ही एक संधी दिसत आहे. त्यामुळे, हा चित्रपट प्रदर्शित करण्याकरता आम्ही थोडा वेळ घेऊ इच्छितो.
तुमचे प्रेम आणि पाठिंबा प्रत्येक पावलावर, प्रत्येक बदलाच्या वेळी माझ्यासोबत होता. मी त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. काही कथांसाठी संयम लागतो. काही प्रवासांसाठी तर त्याहूनही अधिक लागतो. आम्ही तुम्हाला एक असा चित्रपट देण्याचे वचन देतो, ज्याचा तुम्ही मनसोक्त आनंद घ्याल आणि तो साजरा कराल. एक असा चित्रपट जो हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाचा क्षण असेल.”
यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. यात कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘टॉक्सिक’च्या नवीन प्रदर्शनाच्या तारखेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Comments are closed.