वाड्यातील झेडपीचे व्यापारी संकुल बनले दारुड्यांचा अड्डा
तालुक्यातील मोखाडा व खोडाळा बाजारपेठेत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली सुमारे ७० व्यापारी संकुले अद्यापही वापराविना धूळखात पडली आहेत. तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून गाळे वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष व ठोस निर्णय घेतला जात नसल्याने हे गाळे मद्यपींचा अड्डा बनले आहेत. या मद्यपींचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
मोखाडा येथे सुमारे ६० तर खोडाळा येथे १० व्यापारी गाळ्यांचे बांधकाम जिल्हा परिषदेकडून करण्यात आले. मोठा निधी खर्च करून उभारलेली ही मालमत्ता दोन वर्षांहून अधिक काळ वापराविना पडून आहे. त्यामुळे या गाळ्यांभोवती मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. दारुड्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनले आहे. व्यापारी गाळे सुरू झाले असते तर स्थानिक व्यावसायिकांना व्यवसायाची संधी मिळण्यासोबतच जिल्हा परिषदेलाही नियमित उत्पन्न प्राप्त झाले असते. मात्र त्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष गाळे वाटप कधी होणार?
व्यापारी संकुलातील गाळ्यांसाठी अनेक इच्छुक प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पात्रता तपासून गरजू व स्थानिक इच्छुकांना पारदर्शक पद्धतीने गाळ्यांचे वाटप करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या निर्णयाअभावी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अशीच पडून ठेवण्याचे कारण काय, असा सवाल नागरिकांकडून आता उपस्थित केला आहे.
Comments are closed.