मेहकरात धाडसी पोलिसांवर चोरांचा हल्ला; झटापटीत २ पोलीस कर्मचारी जखमी, आरोपी फरार
मेहकर शहरातील रामनगर जवळील डी.पी. रोडवरील लक्ष्मीनारायण नगर भागात आज पहाटेच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली. चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांना रंगेहात पकडण्याच्या प्रयत्नात मेहकर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याला न घाबरता पोलिसांनी धाडसाने त्यांचा सामना केला.
रामनगर जवळील लक्ष्मीनारायण नगर या वसाहतीत आज पहाटे अंदाजे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी आधीच दोन घरांचे कुलूप तोडले होते आणि ते तिसऱ्या घराचे कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान, वसाहतीमधील जागरूक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.
माहिती मिळताच परिसरात गस्तीवर असलेले पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या वाहनात पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण गवई आणि चालक पोलीस कर्मचारी शिवाजी चिम हे तैनात होते.
पोलीस वाहनाने वसाहतीत प्रवेश केला तेव्हा त्यांना खाली एक चोरटा उभा असलेला दिसला. पोलिसांना पाहताच तो इमारतीच्या पायऱ्या चढून वरच्या मजल्याकडे पळाला. त्याला पकडण्यासाठी हेडकॉन्स्टेबल गवई आणि चालक चिम हे दोघेही पायऱ्या चढून वर जात असतानाच, वरून त्याचे इतर दोन अज्ञात साथीदार असे तिघेजण खाली आले.
स्वतःला घेरलेले पाहून चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या दरम्यान चोर आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. चोरट्यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण गवई यांच्यावर लोखंडी रॉडने सपासप तीन वार केले. या हल्ल्यात गवई यांच्या चेहऱ्यावर जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत, तसेच त्यांच्या डोक्यालाही जबर मार लागला आहे. त्याच वेळी चोरट्यांनी चालक शिवाजी चिम यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चिम यांनी तो वार हाताने अडवला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
या झटापटीनंतर चोरट्यांनी वसाहतीमधीलच एका नागरिकाची मोटरसायकल चोरली आणि त्यावर बसून ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मात्र, घाईगडबडीत चोरटे स्वतः घेऊन आलेली मोटरसायकल घटनास्थळीच सोडून गेले आहेत. जखमी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घेतले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांनी सोडलेली मोटरसायकल जप्त केली आहे. याप्रकरणी मेहकर पोलीस पुढील तपास अत्यंत गतीने करत आहेत.
Comments are closed.