मंडपाचे थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक; खड्डा पडल्यास दोन हजारांचा दंड… गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली
मुंबईत गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिकेने जय्यत तयारी केली असून गणेशोत्सव मंडळांना थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल पालिकेला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मंडपाची उंचीदेखील नियमाप्रमाणे करणे अनिवार्य राहणार असून मंडपामुळे रस्त्यावर खड्डा पडल्यास प्रतिखड्डा दोन हजारांचा दंड मंडळाकडून वसूल करण्यात येणार आहे.
मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, तर सवादोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. बारा हजार मंडळांपैकी सुमारे तीन हजार मंडळे रस्त्याच्या बाजूला किंवा मोकळय़ा जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. यासाठी मंडळांना पालिकेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागले. यामध्ये खड्डय़ामुळे होणारा हा दंड टाळण्यासाठी मंडळांनी अत्याधुनिक पद्धतीने रस्त्यावर खड्डा न खणता मंडप उभारावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी पालिकेने वेबसाईटवर खड्डेविरहित मंडप उभारणीची पद्धत उपलब्ध केली आहे. एखाद्या मंडपाच्या वरून केबल किंवा अन्य काही अडथळा येत असल्यास तेथील परिस्थितीनुसार मंडपाची उंची असणार आहे. मोठय़ा मंडळांच्या मंडपाच्या बांधकाम स्थिरतेचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वाहन व पादचाऱ्यांसाठी राखीव जागा
रेल्वे स्टेशन, बस स्थानक, रिक्षा व टॅक्सी थांबे या ठिकाणी पादचारी व वाहनधारकांची ये-जा होत असते. त्यामुळे या ठिकाणी मंडप उभारताना वाहने व पादचाऱ्यांसाठी जागा उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
…तर अनामत रक्कम जप्त होणार
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱया मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल.
मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्लू साथीच्या आजारांचा धोका टाळण्यासाठी मंडप परिसर स्वच्छ ठेवणे ही मंडळाची जबाबदारी असणार आहे.
मुंबई महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून अटी-शर्तीचे उल्लंघन आढळल्यास अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.
Comments are closed.