हिंगोलीत वर्षभरापासून तीन शववाहिका ‘धूळखात’, आरोग्य विभागाचा कानाडोळा; लाखो रुपयांचा खर्च पाण्यात

आरोग्य विभागाच्या परिवहन सेवा पुणे येथील उपसंचालक कार्यालयाकडून हिंगोली जि.प.च्या आरोग्य विभागाला तीन शववाहिका वर्षभरापूर्वी प्राप्त झाल्या; परंतु, या तीनही शववाहिका मागील वर्षभरापासून पिंपळदरी, कुरुंदा व गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात ‘धूळखात’ उभ्या आहेत. विशेष म्हणजे वर्षभरापासून आरोग्य विभागाकडून या शववाहिकांकडे ‘कानाडोळा’ करण्यात आल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

पुणे येथील आरोग्य विभागाच्या परिवहन सेवा उपसंचालक कार्यालयाकडून गत वर्षभरापूर्वी हिंगोली जि.प.च्या आरोग्य विभागाला तीन शववाहिका मंजूर करण्यात आल्या होत्या. या शववाहिका आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनचालक सोपान मोरे तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनचालक राजू धामणकर व वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनचालक नागोराव इंगोले या तिघांना अग्रीम रक्कम देऊन १४ जून २०२५ रोजी पुण्याला पाठवण्यात आले. तीनही शववाहिका हिंगोली जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर पिंपळदरी, गोरेगाव व कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात उभ्या करण्यात आल्या. या शववाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण दगावल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाणार होते; परंतु, आरोग्य विभागाच्या परिवहन सेवा उपसंचालक कार्यालयाकडून हिंगोली जि.प.च्या आरोग्य विभागाला शववाहिकेच्या अनुषंगाने कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे वर्षभरापासून या तीनही शववाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात ‘धूळखात’ उभ्या आहेत. आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयासह हिंगोली जि.प.च्या आरोग्य विभागाला या शववाहिकेचा विसर पडला की, ‘कानाडोळा’ करण्यात येत असल्याचा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शववाहिका नगर परिषदांना देण्यात येणार

शववाहिकेसाठी लागणारे डिझेल व चालक या अनुषंगाने कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नव्हत्या. आरोग्य विभागाच्या परिवहन सेवा उपसंचालक कार्यालयाकडून आता मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असल्यामुळे या तीन शववाहिका जिल्ह्यातील तीन नगर परिषदांना वापर करण्यासाठी दिल्या जाणार आहेत.

डॉ. कैलास शेळके, आरोग्य अधिकारी जि.प. हिंगोली.

शववाहिकेचा ग्रामीण भागाला लाभ मिळावा

जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. या ठिकाणी रुग्ण दगावल्यानंतर मृतदेह नेण्यासाठी या तीन शववाहिकेचा चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या परिवहन सेवा उपसंचालक कार्यालयाकडून जि. प.च्या आरोग्य विभागासाठी देण्यात आलेल्या शववाहिका नगर परिषदेला देण्याचा ‘घाट’ कशामुळे घातला जात आहे? ग्रामीण भागातील रुग्णांचा विचार करून या शववाहिका जिल्हा रूग्णालय अथवा उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयाला देणे आवश्यक आहे.

– बापूराव घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळदरी.

शववाहिका कोणत्या योजनेतून खरेदी?

आरोग्य विभागाच्या (परिवहन सेवा) पुणे येथील उपसंचालक कार्यालयाकडून गतवर्षभरापूर्वी हिंगोली जि. प. आरोग्य विभागाला तीन अत्याधुनिक शववाहिका देण्यात आल्या; परंतु, वर्षभरापासून या शववाहिकेच्या अनुषंगाने कोणत्याही मार्गदर्शक सूचना झाल्या नसल्यामुळे करण्यात प्राप्त तीनही शववाहिका धूळखात अवस्थेत उभ्या आहेत. या शववाहिकेवर आलेला लाखो रुपयांचा खर्च कोणत्या योजनेतून करण्यात आला आहे, याबद्दल जि. प. आरोग्य विभागही अनभिज्ञ आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

Comments are closed.