कोकणवासीयांवर ‘टोल’धाड! रस्ता पूर्ण व्हायच्या आधीच टेंडर निघाली… मे महिन्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर पथकर
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मेअखेरची डेडलाईन दिली असताना व बरीच कामे अजूनही अर्धवट स्थितीत असताना सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावरून मेपासून पथकर वसुली सुरू होणार आहे. या टोल नाक्यासाठी केंद्र सरकारने निविदा मागविल्या आहेत. येत्या 24 एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जाणार असून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. दरम्यान, या टोल नाक्याला तीन वर्षांपूवी स्थानिकांनी जोरदार विरोध करून तो बंद पाडला होता. विशेष म्हणजे महामार्ग विभागाने जाहीर केलेल्या या नव्या निविदेमध्ये स्थानिक वाहनांना टोल करातून वगळण्याबाबत कोणताही उल्लेख नाही.
ओसरगाव टोल नाक्यावरून टोल वसुलीसाठी यापूर्वी तीन एजन्सी नियुक्त झाल्या होत्या. यापूर्वी 14 जून 2023 रोजी टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू करण्यात आली होती. मात्र या एजन्सीकडून टोल वसुली सुरू होताच टोल विरोधी कृती समिती आणि सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार आंदोलने सुरू केली. त्यामुळे ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्यात आली आहेत. त्यानंतर गेली तीन वर्षे टोल नाका सुरू होण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने ओसरगाव टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू करण्यासाठी 17 एप्रिल रोजी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यात जानवली पूल ते पत्रादेवी या 60 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी दुचाकी आणि तीन आसनी वाहने वगळता उर्वरित सर्व वाहनांसाठी टोल वसुलीसाठी एजन्सी निश्चित केली जाणार आहे. यात दरवर्षी वाहनांकडून 57.88 कोटींचा टोल वसूल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हलक्या वाहनांची सर्वाधिक वाहतूक
मुंबई-गोवा महामार्गावरून कार, जीप, व्हॅन यासारखी हलकी वाहने जाण्याचे प्रमाण सर्वाधिक 49 टक्के आहे. बस, ट्रक (दोन अॅक्सल) वाहनांचे प्रमाण 27 टक्के, मल्टी अॅक्सल वाहनांचे प्रमाण 19 टक्के असल्याचेही निविदा नोटिशीमध्ये नमूद केले आहे.
चौपदरीकरणाच्या कामाला मे 2026 ची डेडलाईन
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम मे 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महामार्ग विभागाने केले आहे. दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महामार्गावरील सर्व टोल नाके सुरू करण्याचीही कार्यवाही महामार्ग विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्गातील ओसरगाव हा टोल नाका सर्वप्रथम सुरू करण्याचे नियोजन महामार्ग विभागाने केले आहे.
अशी होणार टोलवसुली
- कार, जीप, व्हॅनसाठी ः वन वे 125 रुपये, जाणे-येणे (एकच फेरी) 190 रुपये, मासिक पास 4170, तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी 65 रुपये.
- मिनी बस, हलक्या वजनाच्या वाहनांसाठी ः वन वे 200 रुपये, जाणे-येणे (एकच फेरी) 305 रुपये, मासिक पास 6740, तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी 100 रुपये.
- दोन अॅक्सल बस आणि ट्रकसाठी ः वन वे 425 रुपये, जाणे-येणे (एकच फेरी) 635 रुपये, मासिक पास 14120, तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी 210 रुपये.
व्यावसायिक वाहनांसाठी ः वन वे 460 रुपये, जाणे-येणे
(एकच फेरी) 695 रुपये, मासिक पास 15405, तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी 230 रुपये. - अजवड वाहनांसाठी ः वन वे 665 रुपये, जाणे-येणे (एकच फेरी) 995 रुपये, मासिक पास 22145, तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी 330 रुपये.
Comments are closed.