अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच रचला कट, मित्रांनाही घेतलं सोबत

अमरावती : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील महिला पोलीस (Police) हत्या प्रकरणाचे गुढ अखेर पोलीस तपासात उलगडले असून पतीनेच महिला पोलिसाच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आलं आहे. राज्य राखीव पोलीस दलात कार्यालयात असलेला आरोपी पती राहुल तायडेनेच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. अमरावतीतील (Amravati) आपल्या दोन मित्राच्या मदतीने पत्नीच्या गळा दाबून पतीनेच महिला पोलिसाची हत्या केली असून आरोपी पतीने एक महिन्यापूर्वी या हत्याकांडाचा कट रचल्याचेही तपासातून उघड झाले आहे. आता, पोलिसांकडून न्यायालयात आरोपीला हजर करुन अधिकची पोलीस कोठडी मागून हत्याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात येईल. तसेच, शवविच्छदेन अहवालाकडेही पोलिसांचे लक्ष लागले आहे.

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत काल (1ऑगस्ट ) राहत्या घरीच महिला पोलीस अंमलदाराची हत्या झाली होती. आशा धुळे (तायडे) वय 38 वर्षे असे या मृतक पोलीस अंमलदार महिलेचं नाव आहे. मात्र, ही हत्या नेमकी का? आणि कुठल्या कारणातून झाली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अशातच आज (2 ऑगस्ट) महिला पोलीस अंमलदाराचं शवविच्छेदन केल्यानंतर शविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतर मृत्यूच कारण समोर येईल. मात्र त्यापूर्वी संशयाची सुई पतीकडे वळल्याने पोलिसांनी रात्रीच पतीला अटक केली. त्यानंतर, पोलिसांनी अधिक तपास केला असता पतीनेच मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.

विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पती देखील राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. हत्या झालेली महिला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होती. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. डीसीपी गणेश शिंदेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनने परिसरासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

आरोपीचे बाहेरच्या महिलेसोबत प्रेमसंबंध

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. आरोपी राहुलचे एका महिलेशी प्रेम प्रकरण होते, त्यातून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. 4 ते 5 वर्षापासून आरोपीचे बाहेरील महिलेशी प्रेम प्रकरण होते, यासंदर्भाने पत्नीने अगोदरच पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. विशेष म्हणजे आरोपी आणि मृत पत्नी यांचा प्रेम विवाह झाला होती, अशी देखील माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

हेही वाचा

दिव्याच्या घरी जाऊन सरन्यायाधीशांची शाबासकी, राज्य सरकारनेही केला सन्मान; बुद्धीबळपटूला किती कोटी मिळाले?

आणखी वाचा

Comments are closed.