पायधुनीतील विषबाधेच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण; कलिंगडाची विक्री थंडावली,भाव गडगडले

कलिंगडातून विषबाधा झाल्यामुळे पायधुनी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अनेकांनी कलिंगड खाणे बंद केले आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरासह एमएमआरडीए क्षेत्रातील किरकोळ विव्रेत्यांकडून होणारी कलिंगडाची खरेदी कमी झाल्याने एपीएमसी मार्केटमधील कलिंगडाची विक्री थंडावली आहे. गेल्या दोन दिवसांत मार्केटमध्ये सुमारे शंभर टन माल शिल्लक राहिला. 18 रुपये किलो या दराने विकले जाणारे कलिंगड आता 10 रुपये किलोने विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. भाव गडगडल्यामुळे बीड, जळगाव, नाशिक, सोलापूर आणि अहिल्यानगर जिह्यातील व्यापाऱयांचे मोठे नुकसान होत आहे.

पायधुनी येथील एकाच कुटुंबातील चौघांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले आणि त्यांचा मृत्यू झाला. या चौघांना कलिंगडातून विषबाधा झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला, अशी बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात मोठय़ा संख्येने नागरिकांनी कलिंगडाची खरेदी करणे बंद केले. त्याचा मोठा परिणाम एपीएमसीच्या फळ बाजारावर झाला. या बाजाराकडे किरकोळ व्यापाऱयांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये कलिंगडाचे मोठमोठे ढीग लागलेले दिसत आहेत. सध्या हंगाम असल्यामुळे मार्केटमध्ये दररोज कलिंगडाच्या सुमारे 40 गाडय़ा येतात. प्रत्येक गाडीत सुमारे 8 ते 10 टन माल असतो. गेल्या दोन दिवसांत निम्मा माल मार्केटमध्ये पडून राहिला आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.

अफवावर विश्वास ठेवू नका

एपीएमसी मार्केटमधून मुंबई शहरात दरदिवशी सुमारे 200 ते 250 टन कलिंगड पाठवले जात आहेत. पायधुनी येथील दुर्घटना वगळता अन्य कोणत्याही नागरिकांना कलिंगडामुळे त्रास झालेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी कलिंगडाची खरेदी बंद करू नये, असे आवाहन एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी केले आहे.

कलिंगडाला दोष नको

पायधुनीमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र या कुटुंबाला कलिंगडामुळे विषबाधा झाली असा सरळ निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. त्यामुळे कलिंगडाला दोष देणे योग्य नाही. नागरिकांनी चांगल्या प्रतीची कलिंगडे विश्वासू विव्रेत्यांकडून खरेदी करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात कलिंगड खाणे हे आरोग्याला चांगले आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय तज्ञ डॉ. शाम मोरे यांनी व्यक्त केली.

निर्यात पूर्णपणे ठप्प

एपीएमसी मार्केटमधून गेल्या वर्षी दररोज सुमारे दीडशे टन कलिंगडांची निर्यात होत होती. मात्र अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे यंदा ही निर्यात पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे कलिंगडाला सुरुवातीपासून चांगला दर मिळाला नाही. आता कुठेतरी दरात वाढ होत असतानाच पायधुनीची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर पसरलेल्या अफवेमुळे कलिंगडाचे दर पुन्हा गडगडले आहेत, अशी प्रतिक्रिया व्यापारी श्रीमूर्ती गोवडा यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.