विषारी दारु मृत्यू प्रकरण गृहखात्याचं अपयश, सुप्रिया सुळे यांची फडणवीस यांच्यावर टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १७ जणांचा बळी गेल्याच्या धक्कादायक घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या भीषण दुर्घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि राज्याचे गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. “हे पूर्णपणे गृहखात्याचे अपयश असून, पुण्याच्या पोलीस आयुक्तांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावे,” अशी आक्रमक मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी शहरातील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, “पुणे हे एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं, पण आज ते महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल बनलं आहे. हे माझे वैयक्तिक आरोप नाहीत, तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विभागाचाच एक अहवाल आहे. त्या अहवालानुसार गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे शहराचा राज्यात पहिला, तर देशात पाचवा क्रमांक लागतो.”

विषारी दारू प्रकरणावर संताप व्यक्त करताना खासदार सुळे म्हणाल्या की, हे मृत्यू नसून हत्या आहेत आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. विषारी दारूचे हे प्रकरण म्हणजे सरकारचे मोठे अपयश आहे. सरकारला हप्ते हा शब्द माहिती नाही का? या अवैध धंद्यांची महाराष्ट्र सरकारला आधीपासूनच पूर्ण माहिती होती. प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर हे प्रकरण नक्कीच थांबवता आलं असतं.

Comments are closed.