गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटींचा भीषण अपघात, ट्रॅक्टरची धडक; सात प्रवाशांचा होरपळून मृत्यू; 40 जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सुरतमधील धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन एसटी बसेसचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भयानक होता की, एक बस थेट महामार्गावर उलटली आणि तिला भीषण आग लागली. या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. काही प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला, या घटनेत दोन चालकांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 40 प्रवासी जखमी झाले आहेत.

सुरतच्या बारडोली येथील उवा गावामध्ये सुरत ते धुळे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला मागून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरने धडक मारली. या धडकेमुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती बस रस्त्याचा दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. त्याच वेळी त्याच मार्गावरून धावणाऱ्या जामनेर ते सुरत बसची तिला पुन्हा एकदा धडक बसली आणि ती बस रस्त्याच्या खाली पलटली आणि तिने पेट घेतला. यात दोन्ही बसेसच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातादरम्यान दोन्ही बसमध्ये अंदाजे 40 प्रवासी होते. त्यातील काही प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने ते बचावले. मात्र पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बसचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे धुळे-सुरत हायवेवरील दोन्ही मार्गांवर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

मृतांची ओळख पटलेली नाही

या अपघातातील बस जामनेर आगाराची होती, त्यावर घनश्याम बरकले (42) हे चालक म्हणून कर्तव्यावर होते. घनश्याम हे जळगावच्या भुसावळ तालुक्यातील कुऱहा पानाचे रहिवासी होते. अद्यापही प्रवाशांची ओळख पटलेली नाही अशी माहिती जळगावचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

राज्य सरकारकडून दहा लाखांची मदत जाहीर

अपघातात जखमी झालेल्या 40 प्रवाशांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील 10 प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या अपघातात धुळे आगारातील चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर केली आहे.

Comments are closed.