ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडनं मागितली 60,000 प्रेक्षकांची माफी… नेमकं काय घडलं?
मुंबई22 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघातल्या प्रतिष्ठेच्या अशेस कसोटी मालिकेला शुक्रवार (21 नोव्हे.) पासून सुरुवात झाली. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना हा अवघ्या दोन दिवसातच संपुष्टात आला. यजमान ऑस्ट्रेलियानं पर्थच्या पहिल्याच कसोटीत इंग्लंडचा तब्बल आठ विकेट्सनी धुव्वा उडवून मालिकेत आघाडी घेतली. महत्वाचं म्हणजे पहिल्या डावात 40 धावांनी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात मात्र 205 धावांचं आव्हान टी20 स्टाईलनं पार करत इंग्लंडला दुसऱ्याच दिवशी पराभवाची धूळ चारली. कांगारुंच्या या विजयात मोलाचं योगदान दिलं ते डावखुरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं. हेडनं वेगवान शतक झळकावून ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोठा वाटा उचलला. पण सामना संपल्यानंतर मात्र त्यानं तब्बल 60,000 प्रेक्षकांची माफी मागितली.
ट्रॅव्हिस हेडचं वादळी शतक
इंग्लंडनं या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याआधी इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 132 धावात गुंडाळला होता. त्यामुळे दुसऱ्या डावातही इंग्लंड कांगारुंवर भारी पडेल असं अनेकांचं मत होतं. पण नियमित सलामीवीर उस्मान ख्वाजाला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रलियानं त्याच्याऐवजी ट्रॅव्हिस हेडला सलामीला पाठवलं. संघव्यवस्थापनाचा हा विश्वास सार्थ ठरवत हेडनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला.
हेडनं अवघ्या 69 चेंडूत शतक ठोकलं. इतकंच नव्हे तर त्यानं मार्नस लाबुशेनसह दुसऱ्या विकेटसाठी 117 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला. त्यानं 83 चेंडूत 16 चौकार आणि 4 षटकारांसह 123 धावा फटकावल्या. तर लाबुशेननं नाबाद 51 धावांची खेळी केली.
हेडनं मागितली प्रेक्षकांची माफी
पण सामना संपल्यानंतर हेडनं प्रेक्षकांची माफी मागितली. कारण अशेस मालिकेतील या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पर्थच्या स्टेडियमवर दोन्ही दिवशी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. शुक्रवारी पहिल्या दिवशी 49 हजार प्रेक्षक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. तर दुसऱ्या शनिवारी दुसऱ्या दिवशी 51 हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. महत्वाची बाब म्हणजे रविवारी पर्थ स्टेडियमवर 60 हजार प्रेक्षक उपस्थित राहणार असा अंदाज होता. सुट्टीचा दिवस असल्यानं या दिवसाची सर्व तिकिटांची विक्री (Sold Out) झाली होती. पण हेडनं आक्रमक खेळ करत दुसऱ्याच दिवशी सामना संपवला.
सामना संपल्यानंतर जेव्हा त्याची मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यानं या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला. घरच्या मैदानावर प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड पाठिंब्यासाठी त्यानं आभार मानले. पण “जे 60,000 प्रेक्षक रविवारी सामना पाहण्यासाठी येणार होते, ज्यांचा हा सामना लवकर संपल्यामुळे हिरमोड झाला त्यांची मी माफी मागतो” असं हेड म्हणाला.
हेडचं वादळ, स्टार्कचा तडाखा
ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्क हे ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे हीरो ठरले. मिचेल स्टार्कनं पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेत इंग्लंडला मोठा हादरा दिला. स्टार्कनं अशेस मालिकेतील कसोटी सामन्यांमध्ये विकेट्सचं शतकही पूर्ण केलं. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड अशा अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत स्टार्कनं कांगारुंच्या आक्रमणाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आणि ती पूर्णपणे निभावली. दरम्यान या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आता 4 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.