आदिवासी विकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांचा आश्रम शाळांमध्ये मुक्काम,नेमकं कारण काय?
गडचिरोली : आदिवासी विकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार आज (7 जानेवारी) शासकीय निवासी आश्रम शाळांमध्ये आदिवासी विकास विभागाचे अधिकारी मुक्कामी राहणार आहेत. त्यामुळे छतावर लागलेले जाळे, भिंतीवरील पिचकाऱ्या असे रूप असलेल्या शासकीय वस्तीगृहाचे चित्र बदलणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके (Dr Ashok Uike) यांनी काही दिवसांपूर्वी गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी शासकीय आदिवासी आश्रम शाळांमधील असुविधांबाबत अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे त्यांनी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना एक रात्र आश्रम शाळांमध्ये स्वतः मुक्कामी राहून तेथील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत आढावा घेण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार अप्पर आयुक्त कार्यालयातून सर्व प्रकल्प कार्यालयांतील मुक्कामी राहणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर झालीय.
या यादीत नागपूरचे आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे हे वर्धा जिल्ह्यातील हिरापूर आश्रम शाळेत मुक्कामी राहणार आहेत. तर उपयुक्त दिगंबर चव्हाण नागपूर जिल्ह्यातील लाडगाव येथे मुक्कामी राहणार आहेत. भामरागडचे प्रकल्प अधिकारी नमन गोयल हालेवारा आश्रम शाळेत मुक्कामी राहणार आहेत. तर गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना गडचिरोलीतीलच आश्रम शाळेत मुक्कामी राहणार आहेत.
अधिकाऱ्यांसाठी रात्री खास मेजवानीचाही बेत?
हे सर्व अधिकारी शाळांमध्ये दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या मुक्कामासाठी आश्रम शाळांमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. आमच्या प्रतिनिधीने काही आश्रम शाळांना भेटी दिली असता, अधिकाऱ्यांसाठी रात्री खास मेजवानीचाही बेत आखण्यात आल्याचे ऐकायला मिळाले.
अधिकाऱ्यांच्या मुक्कामानंतर सुधारणार काय वस्तीगृहांची अवस्था?
नागपूर विभागात 76 आश्रम शाळा असून एकट्या गडचिरोली जिल्ह्यात 43 आश्रम शाळा आहेत. या आश्रम शाळा अतिदुर्गम भागात असल्याने आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. कारवाफा येथील निवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे गडचिरोली वरून अपडाऊन सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची निवासस्थानच वस्तीगृह बनले आहे. तर वस्तीगृहातील अवस्था जर्जर असून बेडची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना फरशीवरच गादी टाकून झोपावे लागत आहे. भिंतींची रंगरंगोटी नसल्यामुळे छतावर जाळे आणि भिंतीवर पिचकाऱ्या अशी बिकट अवस्था येथे दिसून आली. विद्यार्थ्यांना जेवणासाठी टेबलची सोय नाही. शुद्ध पाण्यासाठी बसवलेले आरो मशीन कधी बंद तर कधी चालू अवस्थेत असतात. प्रसाधनगृहाची स्वच्छता होत नसल्यामुळे दुर्गंधीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे हे चित्र आता बदलणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.