लोकसभेतही तृणमूल काँग्रेस फुटणार आहे.

एकोणीस बंडखोर खासदारांची नावे उघड : शत्रुघ्न सिन्हा यांचेही नाव समाविष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, कोलकाता

गेल्या महिन्यात पश्चिम बंगाल राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड पराभवाला तोंड द्यावे लागलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षात लोकसभेतही उभी  फूट पडल्याचे दिसून येत आहे. लोकसभेत या पक्षाचे 28 खासदार असून त्यांच्यातील 19 खासदारांनी बंडखोर गट स्थापन करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. या खासदारांची स्वाक्षरी असलेली सूची प्रसिद्ध करण्यात आलेली असून या सूचीत पूर्वी भारतीय जनता पक्षात असलेले नेते शत्रुघ्न सिन्हा यांचेही नाव आहे.

नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत सायोनी घोष, माला रॉय आणि युसूफ पठाण यांचीही नावे आणि स्वाक्षऱ्या असल्याचे दिसून येते. ही सूची लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. बिर्ला दिल्लीत असल्यानंतर या सूचीसंदर्भात योग्य तो निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतही तृणमूल काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच उभी फूट पडली आहे. विधानसभेत या पक्षाचे 80 आमदार असून त्यांच्यातील 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला असून विरोधी पक्षनेताही निवडला आहे. या नेत्याला विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिल्याने तो वेगळा गट नियमित झाला आहे.

आता लोकसभेतही पुनरावृत्ती

विधानसभेत जे घडले, त्याची पुनरावृत्ती आता लोकसभेतही होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. बंडखोर लोकसभा खासदारांच्या म्हणण्यानुसार ते भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला समर्थन देणार आहेत. मात्र, ते भारतीय जनता पक्षात समाविष्ट होणार नाहीत. बंडखोर खासदारांच्या स्वाक्षऱ्या असणारे पत्र लोकसभा अध्यक्षांना सादर करण्यात आले आहे. मात्र, यासंबंधी अद्याप अधिकृत घोषणा बंडखोरांचा गट किंवा लोकसभाध्यक्ष कार्यालयाकडून करण्यात आलेला नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे बंडखोरांना प्रत्यक्ष भेटून त्यांची भूमिका समजून घेणार आहेत, असे समजते.

भाजपमध्ये गेल्याशिवाय नाही पर्याय

बंडखोरांच्या गटात 19 खासदारांचा समावेश आहे, हे वृत्त तृणमूल काँग्रेसने फेटाळले आहे. बंडखोरांकडे जरी दोन तृतियांश, अर्थात 19 खासदार असले, तरीही ते वेगळा गट स्थापन करु शकणार नाहीत. त्यांना भारतीय जनता पक्षातच समाविष्ट व्हावे लागणार आहे. कारण तसा कायद्याचा नियम आहे, असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्या खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रात 2023 मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला आहे.

राज्यसभेतही त्यागपत्रसत्र

तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या सुश्मिता देव यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. त्या मूळच्या आसामच्या आहेत. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभेतून त्यांची राज्यसभेवर पाठवणी करण्यात आली होती. राज्यसभा सोडलेल्या त्या तृणमूल काँग्रेसच्या दुसऱ्या खासदार आहेत. त्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तृणमूल काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांची भेट घेतली. त्यामुळे त्या आसाममधून राज्यसभेवर जाणे शक्य असल्याचे दिसून येते.

कोणते खासदार फुटणार…

बंडखोरांच्या सूचीत स्वाक्षऱ्या केलेले खासदार पुढीलप्रमाणे आहेत. 1. काकोली घोष दस्तीदार, 2. शत्रुघ्न सिन्हा, 3. युसुफ पठाण, 4. पार्था भौमिक, 5. अबु ताहेर खान, 6. बापी हलदर, 7. सायोनी घोष, 8. रचना बॅनर्जी, 9. असीत मल, 10. शर्मिला सरकार, 11. के. रहमान, 12. मिताली बाग, 13. जून मलिया, 14. कालीपद सोरेन, 15. माला रॉय, 16. जगदीश चंद्र बर्मा बसूनिया, 17. देव अधिकारी, 18. शताब्दी रॉय आणि 19. अरुप चक्रवर्ती, असे हे खासदार आहेत.

संपता संपेना फुटीचे सत्र

ड विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट

ड विधानसभेतील आमदारांपाठोपाठ लोकसभेतही बंडखोरांचा गट होतोय सक्रीय

ड बंडखोर लोकसभा खासदारांच्या गटात शत्रुघ्न सिन्हाही झाले आहेत समाविष्ट

Comments are closed.