युद्ध पुन्हा भडकणार; ट्रम्प म्हणतात, शस्त्रसंधी वाढणार नाही! इराण म्हणतो, धमक्यांना बळी पडणार नाही
‘इराणसोबतचा युद्धविराम वाढवण्याचा आमचा कोणताही विचार नाही. आमची बाजू मजबूत आहे. इराणला करार करावाच लागेल. हा करार झाला नाही तर हल्ले पुन्हा सुरू होतील,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा दिला, तर इराणने चर्चेला अद्याप होकार दिला नसल्याने आजपासून पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे.
इराण-अमेरिकेमध्ये झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत बुधवारी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुदतवाढीबद्दल विचारले असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. ‘मला तसं काहीही करायचं नाही. आमच्याकडे आता फार वेळ नाही,’ असे ट्रम्प म्हणाले. इराणच्या ताब्यात असलेल्या व मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आठ विदेशी महिलांना सोडण्याची मागणीही ट्रम्प यांनी केली. सकारात्मक चर्चेसाठी ते फायद्याचे ठरेल, असे ट्रम्प म्हणाले.
माजी सैनिकांचे युद्धाविरोधात आंदोलन; 62 अटकेत
इराण युद्धाला अमेरिकेत विरोध वाढतच चालला आहे. हे युद्ध थांबवण्याच्या मागणीसाठी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी आज कॅपिटल हिल परिसरात निदर्शने केली. निदर्शकांमध्ये काही ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांचाही समावेश होता. यापैकी 62 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.
इराण युद्धभूमीवर नवे पत्ते उघडणार
‘धमक्या आणि भीतीच्या सावटाखाली आम्ही वाटाघाटी करणार नाही. युद्धभूमीवर नवे पत्ते खुले करण्याची तयारी आम्ही करत आहोत,’ असा सूचक इशारा इराणी संसदेचे सभापती मोहम्मद बाघर घालीबाफ यांनी आज अमेरिकेला दिला.
अमेरिकेची 62 टक्के जनता ट्रम्प यांच्यावर नाराज
इस्रायलच्या नादी लागून इराण युद्धात उडी घेतल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच्या देशातच अडचणीत आले आहेत. ट्रम्प यांच्या कारभारावर अमेरिकेतील तब्बल 62 टक्के जनता नाराज असल्याचे ‘रॉयटर्स’ आणि ‘इपसोस’ या संस्थेने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी ट्रम्प यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हिंदुस्थानचे इस्रायलशी संबंध हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन!
हिंदुस्थान आणि इस्रायलच्या संबंधांवर संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस्टिनमधील विशेष प्रतिनिधी फ्रान्सिस्का अल्बानीज यांनी टीका केली. युद्धखोर इस्रायलशी हिंदुस्थानचे संबंध हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असे त्या म्हणाल्या.
Comments are closed.