जिंकायची औकात नाही म्हणून तुम्ही ईडी, सीबीआय घुसवताय! उद्धव ठाकरे यांनी भाजपवर डागली तोफ
खुट्ट झाले तरी विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआयचे शुक्लकाष्ठ लावणारे भाजप सरकार म्हणजे पुचाटांचा कारभार आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जिंकायची भाजपची औकात नाही म्हणून तिथे ईडी, सीबीआय आणि सीआरपीएफच्या फौजा घुसवल्या जात आहेत, अशी तोफ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज डागली. नाक्यानाक्यावर फौजा उतरवल्यानंतर तिथे महिला मतदानासाठी कशा बाहेर पडतील? या देशात लोकशाही जिवंत आहे की नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सभागृहात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या कार्याचा आढावा घेतानाच विविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले. ‘पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्या वाघिणीसारख्या लढत आहेत, त्या जिंकल्याच पाहिजेत. त्या एका महिलेला हरवण्यासाठी 2 लाखांपेक्षा जास्त सीआरपीएफचे जवान तैनात केलेत. मणिपूर जळत होते, तेव्हा 30 हजार होते आणि बंगालमध्ये काही लोक तर म्हणतात की 5 लाख जवान आहेत. या स्थितीत मतदान होणार कसे? कोण करणार? नाक्यानाक्यावरच्या फौजा पाहून मतदानाला जायची हिंमत होईल का? उद्या त्यांनी ठप्पे मारले आणि ममता हरल्या तर हे ‘जितं मया’ म्हणून तंगड्या वर करून नाचणार. ही लोकशाही आहे का,’ असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ‘विरोधकांचे बुरखे फाडण्याचा इशारा देणाऱ्या फडणवीसांच्याच डोक्यावर बुरखा आहे, आम्ही हिंदू आहोत, आम्हाला बुरखा कुठे घालता, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आता विरोधकांवर आरोप केला जात आहे. पण महिला आरक्षण आताच जाहीर करा, हे माझेच स्टेटमेंट आहे, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
फडणवीस प्रचारात दंग, महाराष्ट्रात विनयभंग
मुख्यमंत्री फडणवीस बंगालमध्ये जाऊन प्रचारात दंग असताना इकडे महाराष्ट्रात महिलांचे विनयभंग होत आहेत. राज्यात ड्रग्जचे रॅकेट सुरू झाले आहे. भोंदूगिरी वाढली आहे. पण सरकारला त्याचे काहीच नाही. फक्त बंगाल जिंकायचाय, आसाम जिंकायचाय अशी भाजपची भूमिका आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपला महिलांविषयी काहीच प्रेम नाही. त्यांचे फक्त महिलांच्या आडून राजकारण सुरू आहे. त्रास देताना महिला आहे की कोण याचा विचार भाजप करत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या संसदेत महिला आरक्षण विधेयक आणले, त्या संसदेच्या उद्घाटनाला महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना का बोलवले नाही? अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याला महिला राष्ट्रपतींना का बोलवले नाही? त्यांच्या हस्ते पूजा का झाली नाही? असे प्रश्न त्यांनी एका महिला खासदाराच्या भाषणाचा संदर्भ देत उपस्थित केले.
शिवाजी महाराज होते म्हणून राम मंदिर झाले
महाराष्ट्राला इतिहास शिकवण्याची गरज नाही. महाराष्ट्र इतिहास घडवणारे राज्य आहे. प्रभू श्रीरामाने राक्षस मारले तसे शिवरायांनी अफजलखानासारखे राक्षस मारले. रामाबरोबर वानरसेना होती तशी शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभे केले. ते आमचे देव आहेत. ते नसते तर आज आपण आपल्या देवांचा उद्घोष करू शकलो असतो का? राम मंदिर बांधू शकलो असतो का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजपचा आझादीच्या लढ्याशी संबंध काय?
बंगालमध्ये प्रचाराला गेलेले योगी आदित्यनाथ यांनी, ‘तुम मुझे खून दो, मै तुझे आझादी दूंगा’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वाक्य स्वामी विवेकानंदांच्या तोंडी घातले. त्याचा संदर्भ देत, भाजपने लिहून दिले तेसुद्धा पाठ करता येत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपचा आणि त्यांच्या मातृपक्षाचा आझादीच्या लढ्याशी संबंधच नाही. आझादीबद्दल बोलणारे ते कोण? केवळ महापुरुषांना बळकावणे सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदुस्थानला बेकारांचा कारखाना करायचाय का?
डिलिमिटेशनमुळे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांचे लोकप्रतिनिधित्व कमी झाले असते. सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात मुले जन्माला घाला, पण पोसणार कोण? नोकऱ्या तुम्ही देणार आहात का? कारखाने, मिल बंद पडल्या. कामगार देशोधडीला लागलेत. हिंदुस्थानला बेकारांचा कारखाना करायचाय का? असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
Comments are closed.