भगव्याला हात लावेल त्याचे तुकडे करा! उद्धव ठाकरे यांचे कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना आदेश; भारतीय कामगार सेनेची 58 वी सर्वसाधारण सभा संपन्न

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाकडून होणाऱ्या कामगार संघटनांच्या फोडाफोडीवरून आज तीव्र संताप व्यक्त केला. शिवसेनेचे नाते कंपनीच्या गेटवर लागलेल्या भगव्याशी आहे. भगव्याला कुणी हात लावेल त्याचे तुकडे कसे करायचे ही जबाबदारी तुमची आहे, असे आदेशच त्यांनी शिवसैनिकांना दिले. पक्षप्रमुख एवढय़ा परखडपणे वागत असतील तर शिवसैनिकांनी कसे वागले पाहिजे, असे ते म्हणाले. भगवा उतरवला आणि दुसरे फडके फडकवले तर ते फक्त डोळे पुसायच्या कामाला येईल, असा सल्ला देत त्यांनी कामगारांना सावधही केले.

भारतीय कामगार सेनेची 58 वी विशेष सर्वसाधारण सभा दादर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिर सभागृहात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. 58 वर्षे कामगार क्षेत्रात नेतृत्व करणे हे येरागबाळय़ाचे काम नाही असे म्हणत त्यांनी कामगार सेनेच्या कार्याचे कौतुक केले. भारतीय कामगार सेनेचे पहिले अध्यक्ष, शिवसेना नेते दिवंगत दत्ताजी साळवी यांच्या आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला.

युद्धात अडकलेल्या कामगारांना मायदेशी परतावेसे वाटत नाही

नोकरीसाठी आखातात गेलेल्या हिंदुस्थानी कामगारांना तिथे जिवाला धोका असतानाही मायदेशी परतावेसे वाटत नाही इतकी बिकट परिस्थिती हिंदुस्थानची झाली असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर शरसंधान केले. हिंदुस्थानात येऊन बेकारीने मरण्यापेक्षा इकडे बॉम्बहल्ल्यात मेलो तरी चालेल असे ते कामगार म्हणाले. ही वास्तविकता राज्यकर्त्यांच्या लक्षात कधी येणार की नाही?’ असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

देश अराजकाच्या दिशेने

देश अराजकाच्या दिशेने चाललाय, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. कामगार न्याय्य हक्कासाठी ओरडताहेत, पण त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही आणि मोर्चा काढला तर ते पाकिस्तानधार्जिणे आहेत असे म्हटले जातेय. पहलगाममध्ये पाकडे कुठून आले हे एक वर्ष झाले तरी कळले नाही मग कामगारांमध्ये पाकडे घुसले हे कसे कळले?

जागेवर पाय रोवून उभे राहणे आणि वेळ पडली तर दोन हात करणे हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. अन्यायाला तोडून मोडून टाकणे हा महाराष्ट्र धर्म आहे. हा महाराष्ट्र धर्मच आपल्या देशाला आणि हिंदुत्वाला वाचवू शकेल. त्यासाठी तयारीने उतरले पाहिजे.

कामगार म्हणजे देशाचा भाग्य देणारा आहे. स्वातंत्र्यलढा असो किंवा एकत्रित महाराष्ट्राचा लढा असो, त्या सर्व लढय़ांमध्ये कामगार उतरला नसता तर कदाचित आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य लांबले असते. गिरणी कामगार इतर कामगारांच्या लढय़ाचे महत्त्व मोठे आहे.

कामगार युनियनच्या क्षेत्रात दुकानदारी सुरू आहे

इतरांच्या युनियन तोडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरे यांनी यावेळी कडाडून टीका केली. ते म्हणाले की, ‘सर्व काही मलाच पाहिजे अशी भाजपची वखवख सर्वत्र सुरू आहे. मालकांच्या खिशातील नाण्यांमध्ये भागीदारी पाहिजे अशी युनियनच्या क्षेत्रात दुकानदारी सुरू आहे,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

कामगारांसाठी आता रस्त्यावर उतरणार – अरविंद सावंत

केंद्रातील जुलमी राजवटीकडून कामगार वर्गावर काही ना काही कारणाने अन्याय होत आहे. त्याविरोधात भारतीय कामगार सेना आता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी दिला. केंद्राने आणलेल्या कामगारविरोधी कायद्यामुळे कामगारांचे मूलभूत हक्क हिरावले गेले. देशभर किमान वेतन देऊ असे त्या कायद्यात आहे, पण ते मिळत नाही. भाजपकडून सत्तेचा गैरवापर करून नोंदणीकृत नसलेल्या संघटनांना कार्यालये दिली जातात, असे अरविंद सावंत म्हणाले.

असंघटित कामगारांना शक्ती देऊ – सचिन अहिर

असंघटित कामगारांना शक्ती देण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम भारतीय कामगार सेना करीत आली असून हे काम सुरूच राहील, असे अभिवचन यावेळी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी दिले.

भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कामगार लष्कर चेअरमन शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते स्वागत आहे करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, सरचिटणीस उपनेते आमदार सचिन अहिर, गुरुनाथ खोत, आमदार मनोज जामसुतकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर भारतीय कामगार सेनेचे अधिकृत उपस्थित होते.

Comments are closed.